कोल्हापूरच्या संशोधकाने शोधल्या थेट पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळीच्या नव्या कुळाचा शोध

0
38

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे प्राणिशास्त्र विभागाचे विद्यार्थी अक्षय खांडेकर यांच्यासह ‘ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशन’च्या दोघा संशोधकांना पिल्लाला जन्म देणार्‍या सापसुरळ्यांच्या नव्या कुळाचा आणि पाच नव्या प्रजातींचा शोध लावण्यात यश आले आहे.

या सापसुरळीची ही भारतीय द्वीपकल्पामधील पहिलीच नोंद आहे. यातील एक प्रजाती कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे.

तामिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्रात पाच वर्षे सुरु असलेल्या संशोधन मोहीमेमधून ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक ईशान अगरवाल, तेजस ठाकरे आणि शिवाजी विद्यापीठाचे प्राणिशास्त्र विभागाचे विद्यार्थी अक्षय खांडेकर यांचे हे संशोधन जर्मनीमधून प्रकाशित होणार्‍या ‘व्हर्टिब्रेट्स झूलॉजी’ या अंतरराष्ट्रीय वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. सापसुरळ्यांचे ३३ ठिकाणांवरुन ८९ नमुने त्यांनी जमा केले.

जिल्ह्यात आढळली प्रजात

नव्या कुळात समाविष्ट केलेली द्रविडोसेप्स गोवाएन्सीस ही प्रजात उत्तर गोव्यातील उत्सुम तसेच महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग (आंबोली) आणि कोल्हापूर जिल्ह्यातून नोंदवली गेली आहे. कोल्हापूर जिल्हातील तिचा आढळ राधानगरी, पंडिवरे (भुदरगड), तळये (गगनबावडा) आणि वाशी (पन्हाळा) या ठिकाणांवरुन नोंदवला गेला आहे. नव्याने शोधलेल्या कुळाला ‘द्रविडोसेप्स’ असे नाव देण्यात आले आहे. ‘द्रविड’ या संस्कृत आणि ‘सेप्स’ या ग्रीक शब्दांवरुन हे नामकरण केले आहे. दक्षिण भारतातील आढळक्षेत्रासाठी ‘द्रविड’ आणि सापसदृश्य ठेवणीसाठी ‘सेप्स’ यांच्या जोडणीतून कुळाचे नाव योजिले आहे.

अंड्यांऐवजी थेट पिल्लांना देतात जन्म

कमी तापमानामधे अंडी उबवण्याच्या अडचणींवरील उपाय म्हणून थेट पिल्लांनाच जन्म देण्याचे समयोजन उत्क्रांत झाले असावे. त्यामुळे अंड्यांऐवजी पिल्लांना जन्म देणे, डोळ्यांवरील खालच्या पापणी पारदर्शक असणे आणि जनुकीय संचाच्या वेगळेपणावरुन द्रविडोसेप्स हे कुळ सबडोल्युसेप्स या कुळापासून वेगळे केले आहे.

या आहेत पाच प्रजाती

द्रविडोसेप्स जिंजीएन्सीस, द्रविडोसेप्स जवाधूएन्सीस, द्रविडोसेप्स कलक्कडएन्सीस, द्रविडोसेप्स श्रीविल्लीपुथुरेन्सीस आणि द्रविडोसेप्स तामिळनाडूएन्सीस या पाचही प्रजातींचे नामकरण त्यांच्या तामिळनाडू राज्यातीलआढळ क्षेत्रावरुन केलेले आहे. रायोपा गोवाएन्सीस, सबडोल्युसेप्स पृदी आणि सबडोल्युसेप्स निलगीरीएन्सीस या तीन प्रजातींचे वर्गीकरणातील स्थान बदलून नव्याने शोधलेल्या कुळामधे निश्चित केलेले आहे.

पिल्लांना जन्म देणार्‍या सापसुरळ्यांवरती प्रकाशित झालेले हे संशोधन या दुर्लक्षित जीवांविषयी कुतुहल वाढवणारे आहे. यातील प्रजातींचे प्रदेशनिष्ठ असणे हे त्यांच्या अधिवासाच्या संवर्धनाचे महत्व अधोरेखित करते. –अक्षय खांडेकर, संशोधक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here