कोल्हापुरातील प्रदूषण कमी होणार; हवा शुद्धीकरण यंत्र, पाण्याचे फवारे मारणारे पंप बसवणार; महापालिकेचा उपक्रम

0
43

कोल्हापूर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत महानगरपालिकेमार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत असून, शहरात हवा शुद्धीकरण यंत्र, पाण्याचे फवारे मारणारे पंप बसविण्यात येणार आहेत.

याशिवाय ‘झूम’ प्रकल्पाच्या परिसरात सात हजार वृक्ष लावले जाणार आहेत. ही माहिती शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांनी पत्रकारांना दिली.

दाभोळकर कॉर्नर येथे धूलिकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हवा शुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत निधीमधून पाच लाख रुपये खर्च करून हे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते आज, शनिवारी (दि. २०) सकाळी साडेअकरा वाजता दाभोलकर कॉर्नर येथे करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष आमदार प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, संजय मंडलिक, आमदार सतेज पाटील, श्रीमती जयश्री जाधव, ऋतुराज पाटील, प्रशासक के. मंजुलक्ष्मी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडाळाचे प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे उपस्थित राहणार आहेत.

प्रायोगिक तत्त्वावर लक्ष्मीपुरी, गंगावेश, कोंडाओळ या तीन ठिकाणी पाण्याचे फवारे मारणारे पंप बसविले जाणार आहेत. सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत पंधरा फूट उंचीचे फवारे हवेत सोडले जाणार आहेत. त्यामुळे हवेतील धूलिकणांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा आहे. पाण्याचे फवारे मारणारे पंप बसविण्यासाठी दहा ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. शहरातील मुख्य चौकात मिस्ट टाइप वॉटर फाउंटन उभारणार येणार आहेत.

अत्याधुनिक गॅस दाहिनी उभारणार

केंद्र शासनाकडून राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम योजनेअंतर्गत पंचगंगा स्मशानभूमीत हवेचे प्रदूषण कमी करणारी अत्याधुनिक गॅस दाहिनी उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर दैनंदिन घनकचरा संकलनाकरिता नव्याने सीएनजी ऑटो टिप्पर खरेदी करण्यात येणार आहेत.

‘झूम’ प्रकल्प परिसरात ७५०० वृक्ष लावणार

घनकचरा प्रक्रिया प्रकल्प येथे कंपाउंड वॉललगत आजूबाजूच्या परिसरामध्ये हवेद्वारे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी देशी प्रजातीचे मोठ्या आकाराचे ७५०० वृक्ष लागवड करून बफर झोन तयार करण्यात येणार आहे. ही झाडे सर्किट हाउस मुख्य रस्त्यापासून ‘झूम’ प्रकल्पाच्या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात येणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here