30 जानेवारी 1948 रोजी संध्याकाळी महात्मा गांधी यांनी सरदार पटेल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शेवटचं जेवण घेतलं. त्यांच्या जेवणात दीड कप बकरीचं दूध, भाज्यांचं सूप आणि तीन संत्र्यांचा समावेश होता.
त्या वेळी ते सूतकताईही करत होते. प्रार्थना सभेसाठी आधीच उशीर झाल्याचं काही वेळाने पटेल यांची मुलगी मनुबेनने बापूंना सांगितलं. त्यानंतर बापू उठून उभे राहिले. मनूने त्यांचं पेन, चष्म्याची केस, वही, जपाची माळ आणि थुंकदाणी घेतली आणि बापूंना आधार देऊन त्यांच्यासोबत बाहेर निघाली.
30 जानेवारी 1948 रोजी नेमकं काय घडलं?
30 जानेवारीला संध्याकाळी दिल्लीतल्या बिर्ला हाउसमध्ये उपस्थित असलेले लेखक आणि पत्रकार विन्सेंट शीन यांनी त्यांच्या ‘लीड, काइंडली लाइट’ या पुस्तकात लिहिलं आहे, की ‘मी पाच वाजण्यापूर्वी बिर्ला हाउसमध्ये आलो. तिथं बीबीसीचे दिल्ली प्रतिनिधी बॉब स्टिमसन उपस्थित होते. बॉब यांनी त्यांच्या घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाले की, ‘फारच अजब आहे. गांधी एवढा उशीर कधीच करत नाहीत.’ आम्ही दोघं चर्चा करत असताना बॉब म्हणाले की ते आलेत. तेव्हा घड्याळात पाच वाजून 12 मिनिटं होत होती.’
पेग्विंनने प्रकाशित केलेल्या ‘महात्मा गांधी : मृत्यू और पुनरुत्थान’ या पुस्तकात मकरंद परांजपे लिहितात, बापू जेव्हा प्रार्थना स्थळी पोहोचले तेव्हा खाकी कपडे परिधान केलेला एक तरुण गर्दीतून त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे वाकला. ती व्यक्ती नथुराम गोडसे होता. मनुबेन त्याला मागे सरकण्यासाठी सांगू लागली तेव्हा त्यांना ढकलण्यात आले. गोडसेने पिस्तुल काढलं आणि पॉइंट ब्लँकमधून एकामागोमाग एक तीन गोळ्या झाडल्या. कोणाला काही समजण्याच्या आत बापू खाली कोसळले.
कहाणी बेरेटा पिस्तुलाची
नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर ज्या पिस्तुलातून गोळी झाडली ते पिस्तुल सीरियल नंबर 606824 चं सात चेंबरचं सेमी ऑटोमॅटिक एम 1934 बेरेटा पिस्तुल होतं. त्या काळी भारतात हे पिस्तुल मिळणं दुर्मीळ आणि अवघड होतं; मात्र दुसऱ्या महायुद्धात इटलीसह अनेक देशांचे सैनिक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते. अचूक नेम आणि धोका देण्याची शक्यता कमी ही बेरेटा पिस्तुलाची मुख्य वैशिष्ट्यं आहेत.
पहिल्या महायुद्धात सुरू झाली निर्मिती
बेरेटा पिस्तुल बनवणारी कंपनी 1526 पासून व्हेनिसमध्ये बंदुकीच्या बॅरल्सची निर्मिती करत होती. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा कंपनीचा व्यापार अचानक तेजीत आला. कंपनीने 1915 मध्ये इटलीच्या सैनिकांना शस्त्रास्त्र पुरवठा सुरू केला. यादरम्यान बंदुकीचं उत्पादन सुरू झाले. कंपनीच्या पिस्तुलाची गुणवत्ता आणि विश्वासार्हता खूप अचूक होती. त्यामुळे अल्पावधीतच ते सैनिकांच्या पसंतीस उतरलं.
एम 1934 चा जन्म कसा झाला?
1930 च्या दशकाच्या सुरुवातीला जर्मनीचं वॉल्थर पीपी पिस्तुल खूप लोकप्रिय होतं. इटलीचे सैनिकदेखील त्याकडे आकर्षित झाले. आपण काही नवीन दिलं नाही, तर आपला ग्राहक हातून जाईल असं बेरेटा कंपनीला वाटू लागलं. त्यानंतर बेरेटा एम 1934 लाँच करण्यात आली. ही बंदुक खूप खास होती. ती अतिशय कॉम्पॅक्ट आणि वजनानं हलकी होती. आकाराच्या तुलनेत तिच्या काडतुसांचा पॅक खूप मजबूत होता. दुसऱ्या महायुद्धादरम्यान बेरेटानं दहा लाखांहून जास्त एम 1934 पिस्तुलांची विक्री केली.
गांधीहत्येसाठी वापरलं गेलेलं पिस्तुल भारतात कसं आलं?
या पिस्तुलाचा मागोवा घेताना अनेक घटक विचारात घ्यावे लागतील. हे पिस्तुल 1934 मध्ये उत्पादित केलं होतं किंवा 1934 किंवा 1935 मध्ये इटलीच्या सैन्यातल्या एखाद्या अधिकाऱ्याला ते मिळालं होतं.
त्यानंतर ज्या अधिकाऱ्याला हे पिस्तुल मिळालं, तो ते सोबत घेऊन आफ्रिकेला गेला. त्या वेळी इटलीने सध्याच्या इथियोपियावर हल्ला केला होता. नंतर जेव्हा इटलीच्या सैन्याला ब्रिटिश फौजांनी धूळ चारली तेव्हा 4th ग्वाल्हेर इन्फंट्रीच्या ब्रिटिश अधिकाऱ्याला वॉर ट्रॉफीच्या स्वरूपात हे बेरेटा पिस्तुल मिळालं.
गोडसेला ही बंदूक कोणी दिली?
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला हे पिस्तुल कोणी दिलं असं प्रश्न उपस्थित होतो. इतिहासकार आणि लेखक डॉमिनिक लापिर आणि लेरी कॉलिन्स त्यांच्या ‘फ्रीडम अॅट मिडनाइट’ पुस्तकात लिहितात, की नथुराम गोडसेने प्रथम दिल्लीतील निर्वासितांच्या छावण्यांतून पिस्तुल मिळण्याचा प्रयत्न केला; पण तो अयशस्वी झाला. शेवटी दिल्लीपासून 194 मैल दूर असलेल्या ग्वाल्हेरमध्ये त्याला यश मिळाले. गांधी हत्येच्या तीन दिवस आधी 27 जानेवारी 1948 रोजी ग्वाल्हेरच्या दत्तात्रय सदाशिव परचुरे याने त्याला पिस्तुल दिली. परचुरे हिंदू महासभेशी संबंधित होते आणि हिंदू राष्ट्र सेना या नावाची संघटना चालवत होते.
500 रुपयांत निश्चित झाला सौदा
अप्पू अॅस्थोस सुरेश आणि प्रियंका कोटमराजू यांनी ‘द मर्डरर, द मोनार्क अँड द फकीर’ या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, की नथुराम गोडसे आणि नारायण आपटे एका चांगल्या शस्त्राच्या शोधात ग्वाल्हेरला पोहोचले.
त्या वेळी गोडसेकडे एक देशी कट्टा होता; पण तो भरवसा ठेवण्यायोग्य नव्हता. तेव्हा त्यांनी परचुरेकडे मदत मागितली. त्यानंतर परचुरेने शस्त्रास्त्र पुरवठादार गंगाधर दंडवतेशी संपर्क साधला; पण एवढ्या कमी वेळात शस्त्र मिळणं कठीण होतं.
शेवटी दंडवते एचआरएस अधिकारी जगदीश गोयल यांच्याकडे गेले आणि 500 रुपयांच्या बदल्यात त्यांचं पिस्तुल मागितलं. 24 वर्षांचे गोयल त्यांचे हत्यार देण्यास तयार झाले. त्या वेळी 300 रुपये आगाऊ देण्यात आले आणि 200 रुपये नंतर देण्याचं निश्चित झालं.