शरद पवार प्रगल्भ नेते, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला; जयंत पाटलांची प्रतिक्रिया

0
99

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे.

या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे.

निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आयोगाचा निकाल अनपेक्षित होता. कारण आमच्या वकिलांच्या मुद्द्यावर समोरच्याच्या वकिलांकडून प्रतिवाद झाला नव्हता. आयोगाने असा निर्णय देऊन आमच्यावर आणि शरद पवार यांच्यावर अन्याय केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असून सुप्रीम कोर्ट लोकसभा निवडणुकीपूर्वी आमच्याबाबत न्याय करेल, असं जयंत पाटील यांनी सांगितले.

लोक शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवतील. आम्हाला काही फरक पडणार नाही. आम्ही आणि सर्व कार्यकर्ते शरद पवार यांच्या सोबत राहून आलेल्या परिस्थितीला तोंड देऊ. शरद पवार यांचे वय आणि मन यांच्यात अंतर आहे. शरद पवार आजही मनाने तरुण आहेत. शरद पवार हे प्रगल्भ नेते आहेत, त्यांना सारा देश ओळखतो. अशा प्रकारचा निर्णय शरद पवार यांच्यावर अन्यायकारक आहे. आमदार फोडण्याबरोबर पक्षही पळवून नेला जात असेल तर ही लोकशाहीला धक्का बसेल, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

निर्णय देताना निवडणूक आयोगाने नेमकं काय म्हटलं?

  1. अजित पवारांचा पक्ष हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
  2. पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरण्याची अजित पवारांना परवानगी
  3. शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता
  4. महाराष्ट्रातले ४१ आणि नागालँडमधील ७ आमदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
  5. लोकसभेचे २ खासदार अजित पवारांच्या बाजूने आहेत.
  6. एका खासदाराने दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
  7. महाराष्ट्रातल्या ५ आमदारांनी दोन्ही बाजूंनी प्रमाणपत्र दिलं.
  8. राज्यसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने चिन्हा आणि पक्षाचं नाव सुचवावं.
  9. ७ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पर्याय न दिल्यास अपक्ष म्हणून मान्यता मिळेल.
  10. राष्ट्रवादीत पक्षांतर्गत निवडणुका लोकशाही मार्गाने झाल्या नाहीत.

निकाल नम्रपणे स्वीकारतो-

कोणत्याही पक्षाच्या संदर्भात घडामोडी घडल्यानंतर न्याय मागण्याची पद्धत आहे. यानुसार आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो होतो. आमचे म्हणणे मांडले, इतरांनीही त्यांचे म्हणणे मांडले. लोकशाहीमध्ये बहुमताला प्राधान्य असते, त्यानुसार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे चिन्ह घडाळ आणि झेंडा आम्हाला मिळाल्या. आमच्या सोबतच्या ५० आमदारांनी जो निर्णय घेतला आहे, त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. विधासभेत अध्यक्षांसमोरही सुनावणी झाली आहे. ते कधी निकाल देतील ते माहिती नाही. ते लवकरात लवकर निकाल देतील अशी अपेक्षा आहे, असे अजित पवार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here