कोल्हापूर : कोल्हापूर व सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी भोगावतीचे पाणी बाेगद्याद्वारे दुधगंगा नदीत वळवणे, राजाराम बंधारा व सांगलीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बदलून येथे बलून (फुगा) प्रकारातील बंधारा तयार करणे, पंचगंगा नदीला मिळणाऱ्या नद्या तसेच पंचगंगा व व कृष्णा नदीच्या संगमाचे क्षेत्र बदल अशा महत्त्वाकांक्षी योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर व सांगलीमध्ये येणारा महापूर रोखण्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने उपाययोजना करण्यात येणार असून त्या उपाययोजनांचे सादरीकरण बुधवारी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले. त्यामध्ये वरील उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
पंचगंगा व कृष्णा नदीचा संगम नृसिंहवाडी येथे होतो. भोगावती आणि कासारीचा संगम प्रयाग चिखली येथे आहे. बहिरेश्वर येथील कुंभी, भोगावती यांचा संगम आणि बीडशेड येथे तुळशी आणि भोगावतीचा संगम आहे या संगमाचे क्षेत्र बदलणे प्रस्तावित आहे. यासह विविध उपाययोजनांसाठी काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसाठी ८०० कोटी व सांगलीसाठी ८८० कोटी रुपये लागणार आहेत.
अन्य उपाययोजना
- राधानगरी धरणाच्या स्पिलवेचे नूतनीकरण, रेडियल गेट्सने बदलले, सर्व्हिस गेटसची दुरुस्ती
- नदीपात्रातील तळातील गाळ काढून योग्य दिशेने पाणी प्रवाहित करणे,
- नदीचा क्रॉस सेक्शन चांगल्या स्थितीत आणणे.
- पुलांसह प्रवाहातील वेगवेगळ्या प्रकारचे अडथळे दूर करणे
- मलबा हटवणे आणि नदीचे पुनर्विभागीकरण करणे.
बलून बंधारे..
कोल्हापुरातील राजाराम बंधारा आणि पुढे सांगलीत आयर्वीन पूल व डिग्रज येथे बलून पद्धतीचे बंधारे प्रस्तावित आहे. पंचगंगा नदी ते शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुकडी, रुई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ आणि कुरुंदवाड येथील ९ के.टी.च्या ८१ किमी लांबीच्या बाजूने बांधलेल्या तारा पाण्याच्या प्रवाहात अडथळे बनत असून येथे हे बलून प्रकार बंधारा प्रस्तावित असून त्यासाठी २०० कोटी निधी लागणार आहे.
भोगावती दुधगंगा बोगदा
राधानगरी धरणातील विसर्ग भोगावतीतून जातो त्यामुळे पंचगंगा नदीला पूर येतो हा विसर्ग भोगावती नदीतून दुधगंगेकडे वळविण्यात येणार आहे. करंजफेण गावाजवळ राधानगरी धरणाच्या खालच्या दिशेने नरतवडेपर्यंत ५५७ मीटरचा बोगदा प्रस्तावित आहे. बोगद्याची लांबी ६.३ किलोमीटर व व्यास १५ मीटरचा आहे. यामुळे पुराच्या पाण्याची पातळी कमी होणार आहे.
सांगलीतील पूरनियंत्रण उपाययोजना
- टेंभू (कराड) आणि के. टी. वीर राजापूर येथील कृष्णा नदीतील गाळ काढून नदीचे पात्र खोल करणे.
- सांगली शहर पाणी पुरवठ्यासाठीची योजना बदलणे व बॅरेज बांधणे
- सांगली, मिरज, कुपवाडमधील पूरग्रस्त २५०० कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन
- नदी पुनर्विभागासाठी दोन्ही काठावर ५०० हेक्टर जमिनीचे संपादन
- कृष्णा नदी काठाची पुनर्बांधणी, संरक्षण व बळकटीकरण.
- उतारावर गवत (टर्फिंग) लावणे.