प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा नवी दिल्ली
: पंजाब , हरियाणा राज्यांच्या शंभू आणि खनौरी सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांना सीमेवरच अडवले आहे. पण, शेतकरी दिल्लीत जाण्यासाठी ठाम आहेत. याच दरम्यान केंद्र सरकारने रात्री उशिरा एक मोठी घोषणा केली.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याची माहिती देताना सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांना फायदा मिळावा यासाठी ऊस खरेदीच्या दरात ८ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे ऊस दराच्या भावात प्रतिक्विंटल २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
सध्या ऊसाची खरेदी किंमत ३१५ रुपये प्रति क्विंटल आहे. दरम्यान या निर्णयामुळे ती आता ३४० रुपये प्रति क्विंटल होईल.केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, ‘मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काम करत आहे.
याअंतर्गत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उसाचा खरेदी दर निश्चित करण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला आहे. ऊसाची खरेदी किंमत म्हणजे एफआरपी ३४०रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे.
या पूर्वी ती ३१५ रुपये प्रति क्विंटल होती.पंजाब आणि हरियाणा या राज्याच्या सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत. पोलीस त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, आंदोलक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन करत बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांची पोलिसांसोबत जोरदार चकमक झाली. या घटनेत एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.
तर, २५ जण जखमी झाले आहेत. तर, १२ पोलीस कर्मचारीही गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या योजनेला दोन दिवस ब्रेक लावला, पुढील रणनीतीसाठी शेतकऱ्यांनी शुक्रवार दि २३ फेब्रुवारी पर्यंतची वेळ निश्चित केली आहे.
शेतकरी आंदोलनात या घडामोडी घडत असतानाच मोदी सरकारने कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती देताना सांगितले की, मोदी सरकारने शेतकऱ्यांचे हित नेहमीच सर्वोच्च ठेवले आहे. प्रत्येक वेळी सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलली. ऊस खरेदीच्या दरात ८ टक्के वाढ करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळाने साखर हंगाम २०२४/२५(ऑक्टोबर-सप्टेंबर) साठी साखर कारखानदारांनी देय असलेल्या ऊसाच्या ‘वाजवी आणि लाभदायक किंमत’एफआरपी ला मंजुरी दिली आहे. उसाची एफआरपी ३१५ रुपये प्रतिक्विंटलवरून ३४० रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे. म्हणजे उसाच्या भावात क्विंटलमागे २५ रुपयांनी वाढ झाली आहे.