जिल्ह्यात २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील २६ व २७ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणानंतर प्राथमिक अहवालात निदर्शनास आले आहे.
जिल्ह्यात २६ ते २८ ऑगस्टच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे रब्बी हंगामातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावला. खरीप हंगामात कमी पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाले.
त्यातच कपाशी व सोयाबीनला अल्प भाव आहे. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. शेतकऱ्यांना रब्बी हंगामापासून अपेक्षा होत्या.
रब्बी हंगामात मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, रब्बी कांदा, ज्वारी, मका या पिकांची पेरणी केली. मात्र, अवकाळी पावसामुळे नुकसान झाले.
अवकाळी पाऊस, वादळी वारा व गारपिटीमुळे शेतीपिके व फळपिकांच्या बाधित झालेल्या नुकसानीबाबत प्राथमिक अंदाजित अहवाल सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यात २६ व २७ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पावसाने ३१ हजार ५१० शेतकऱ्यांचे २१ हजार ७६८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, २७ व २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी पावसामुळे १३९ गावांतील ९२७४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
सात तालुक्यांत भाजीपाल्याचे नुकसान
२६ व २७ फेब्रवारी दरम्यान आलेल्या वादळी वारा व अवकाळी पावसाने सात तालुक्यांतील भाजीपाला पिकाला मोठा फटका बसला आहे. यामध्ये सिंदखेड राजा, बुलढाणा, खामगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, देऊळगाव राजा या तालुक्यांत नुकसान झाले आहे.
१५ फेब्रुवारी रोजी ११७ हेक्टरवर नुकसान
खामगाव तालुक्यात १५ फेब्रुवारी रोजी आलेल्या पावसामुळेही नुकसान झाले आहे. यामध्ये १५ गावांत ११७.६७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, ज्ञानगंगापूर, वाकूड, कुर्हा, राहूड, पिंप्री देशमुख, सुजातपूर, चिखली बु. व खुर्द, लांजूड व हिवरा खुर्द या गावांचा समावेश आहे