
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर दि : 28 (जिमाका) महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती आणि तत्कालीन कालखंडात मराठा योध्यांकडून वापरली गेलेली शस्त्रे यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून महाराष्ट्र शासनाने शिवशस्त्र शौर्यगाथा या शस्त्र प्रदर्शनाचे भोसले घरण्याशी संबंधित सातारा, नागपूर व कोल्हापूर या शहरांमध्ये प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन केवळ राज्य शासनाचा उपक्रम न राहता तो लोकोत्सव म्हणून साजरा करण्याच्या दृष्टीने सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी केले .
राजर्षी शाहू महाराज जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे आज शिवशस्त्रशौर्यगाथा या उपक्रमांतर्गत लंडन येथून आणलेल्या वाघनखे व मराठाकालीन शस्त्र प्रदर्शनाचे श्री. शेलार यांच्या हस्ते ऑनलाईन तर पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून संयुक्तरित्या उद्घाटन केले.

याप्रसंगी व्यासपीठावर पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयेन एस, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे व उपसंचालक हेमंत दळवी आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, हे प्रदर्शन सर्वसामान्य नागरिकांसाठी तब्बल आठ महिने सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, पोलीस दल तसेच संरक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींच्या सहाय्याने संपूर्ण जिल्हाभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे जेणेकरुन महाराजांचा प्रेरणादायी इतिहास सर्वांसमोर येईल. यासाठी सांस्कृतिक विभाग सर्वतोपरी सहाय्य करेल.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, लंडन येथील व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमच्या सहकार्याने राज्य शासनाने कोल्हापुरात वाघ नखे आणली आहेत. महाराजांचा दैदिप्यमान इतिहास युवा पिढी पुढे यावा. यातून युवा पिढीने प्रेरणा घ्यावी यासाठी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन युवा पिढीने कार्यरत रहावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. तर खा. छत्रपती शाहू महाराज म्हणाले, या शस्त्र प्रदर्शनामधून मराठा शैली आणि इतर भारतीय शैलीची अप्रतिम सांगड दिसते आहे. सामान्य जनतेसाठी हे प्रदर्शन म्हणजे एक महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे. या प्रदर्शनात केवळ शस्त्रे नाहीत तर तो एक सजीव वारसा आहे.

पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेले आणि कोल्हापूर शहरात आठ महिने चालणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांना दांडपट्टा, ढाली, तलवारी, बर्चे, भाले, वाघनखे यासारखी तब्बल 235 विविध शिवकालीन शस्त्रे पाहता येतील. यावेळी आझाद नाईकवाडी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत वीररस युक्त पोवाडा सादर केला तर भुदरगड तालुक्यातील वेंगरुळ येथील सव्यासाची गुरुकुल मधील विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्ध कलेची थरारक प्रात्यक्षिके लखन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केली. ही प्रात्यक्षिक पाहण्यासाठी प्रशासनातील सर्वोच्च अधिकाऱ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



