0
22

आरोग्य सेवांबाबत सनियंत्रण प्रणाली प्रभावी करा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर*जिल्ह्यात एक दिवस आरोग्यासाठी मोहीम राबविण्यात येणार

कोल्हापूर दि.27* : आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या सर्व आरोग्यविषयक भौतिक सुविधांचा पुरेपूर वापर होण्यासाठी, नागरिकांना आरोग्य सेवा गुणवत्तापूर्ण देण्यासाठी प्रत्येक स्तरावर सनियंत्रण प्रणाली प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. प्रत्येक ठिकाणच्या सनियंत्रणातून काम योग्य पद्धतीने होत असल्याची खात्री करता येईल. सनियंत्रण प्रणाली मार्फत त्या त्या ठिकाणी भेटी देत असलेल्या सेवांची पडताळणी तसेच कामकाजाचा आढावा योग्य पद्धतीने घेता येईल असेही ते यावेळी म्हणाले. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथील राणी इंदुमती सभागृहात आढावा घेतला.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्तिकेयन एस.,आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता यांच्यासह संबंधित 0विभागाचे व राष्ट्रीय आरोग्य मिशन मधील सर्व अधिकारी उपस्थित होते.

प्रभावी सनियंत्रणाच्या सूचना करीत असताना त्यांनी आढळून आलेल्या त्रुटींबाबत गांभीर्याने लक्ष देत संबंधितावर कारवाई करण्याचेही निर्देश दिले. या अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यात लवकरच ’एक दिवस आरोग्यासाठी’ उपक्रम राबवून अभियान स्वरूपात प्रत्येक गाव-वाडी-वस्तीवर आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले. यामध्ये गावातील शौचालयांच्या सेप्टिक टाकीच्या पाईपला जाळ्या बसवणे, गप्पी माशांचा वापर करणे, गावातील जलसुरक्षकाला प्रशिक्षण देणे, पाणी तपासणी मोहीम राबविणे आणि आयुष्यमान भारत कार्ड वितरित करणे अशा पाच घटकांचा समावेश एक दिवस आरोग्यासाठी अभियानात करण्यात यावा अशा सूचना केल्या. या उपक्रमाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी माहिती दिली. नागरिकांचे आरोग्य सुस्थितीत राहावे, गाव स्तरावर वेगवेगळे साथीचे आजार होऊच नयेत यासाठी स्वच्छता व पाणी या अनुषंगाने नागरिकांना माहिती मिळावी तसेच शासकीय आरोग्यविषयक योजनांचा प्रसार व्हावा या अनुषंगाने हे अभियान राबविण्यात येणार आहे.

बैठकीत पालकमंत्री आबिटकर यांनी जिल्ह्यातील कामकाज राज्यासाठी आदर्शवत व्हावे यासाठी आरोग्य विभागाने चांगल्या प्रकारे उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करीत नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध कराव्यात अशा सूचना केल्या. ते म्हणाले रुग्णवाहिका, तालुका स्तरावर आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेले ईसीजी सुविधा, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासणी, तसेच गावाची पाणी व स्वच्छतेमधील असलेली जबाबदारी याबाबत सविस्तर माहिती व जनजागृती करावी. आरोग्य विभागाच्या सुविधांबाबत सर्वसामान्यांमध्ये सकारात्मक भावना निर्माण व्हावी यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून काम करावे असे निर्देश त्यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here