Kolhapur: अंबाबाई आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मंजूरी

0
37
Kolhapur: अंबाबाई आराखड्याला जिल्हास्तरीय समितीची मंजूरी

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरा विकास प्राधीकरणअंतर्गत करण्यात आलेल्या १४४८ काेटींच्या आराखड्याला सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली.

महापालिकेचा आराखडा व प्राधीकरणअंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये समावेश असलेली कामे व त्याची रक्कम एका आराखड्यातून वगळून ही मंजूरी देण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर जूनमधील अर्थसंकल्पात प्राधीकरण आराखड्यासाठी निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न करू अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात अंबाबाई मंदिर विकास प्राधीकरण आराखड्याबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक झाली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बैठकीला जिल्हाधिकारी अमोल येडगे, आमदार जयश्री जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस. आर. पाटील, देवस्थान समितीचे अभियंता सुयश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेने अंबाबाई मंदिर परिसर विकासासाठी बनविलेल्या २५५ कोटींच्या आराखड्याअंतर्गत ४५ कोटींच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. त्या आराखड्यात व नव्याने बनविण्यात आलेल्या अंबाबाई मंदिर विकास प्राधीकरण अंतर्गत बनविलेल्या आराखड्यात दर्शन मंडप, पार्कींग सारखी काही कामे आली आहे.

या दोन्ही आराखड्यांचे प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आले आहेत. त्याची स्क्रुटिनी करताना एकच काम दोन्ही आराखड्यात असल्याने एका आराखड्यातून ते काम व त्याची रक्कम वगळण्यात यावी अशी सूचना शासनाकडून आली आहे. ही दुरुक्तीची कामे वगळून सुधारीत आराखड्याला जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

लोकसभा निवडणुकीनंतर जूनमध्ये सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात प्राधीकरण विकास आराखड्यासाठी निधीची तरतूद करण्याचा प्रयत्न आहे त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here