महाराष्ट्राला अजूनही जोरदार पावासाची प्रतिक्षाच; राज्यात फक्त इतके टक्के पाणीसाठा, आकडेवारी आली समोर..

0
108

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा.

राज्यात उशिराने दाखल झालेल्या पावसामुळे जल प्रकल्प तुडूंब भरतील असे वाटत होते. पण सध्या राज्यातील जलसाठा ६३.४८ टक्क्यांवरच असून मागील वर्षीच्या तुलनेत ही २० टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्रात २१, मराठवाड्यात १८, तर विदर्भात ९ टक्के तुटीचा पाऊस झाला. उरलेल्या पावसाळ्यात दमदार पावसाची आस कायम आहे. मात्र मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर मानली जात आहे.


राज्यात मान्सून आगमनानंतर वाटचाल चांगली झाली. पण अद्यापही धरणातील जलसाठा पुरेसा झालेला नाही. राज्यातील उर्वरित धरणक्षेत्र अजूनही कोरडेच आहे. जुनअखेर ते जुलै मध्यात आणि अखेरीस महाराष्ट्रात धो-धो बरसलेल्या पावसामुळे कुठे दरडी कोसळल्या तरी कुठे महापूर आले. यामध्ये नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले.

मात्र, त्यानंतर दडी मारलेला पाऊस पुन्हा परतत नसल्याने राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे. राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांतील जलसाठ्याची स्थिती बघितली असता या प्रकल्पातील जलसाठा हा केवळ ६३.४८ टक्क्यांवर असून, मागील वर्षी तो याच तारखेला ८३.३४ टक्के होता.

यंदा प्रकल्पात २० टक्के तूट असल्याचे दिसत आहे. त्यामुळे धो-धो बरसलेल्या पावसानंतरही राज्यातील प्रकल्प ‘साठी’च गाठू शकल्याचे चित्र आहे. कोकण विभागात ९ टक्के जादा पाऊस झाल्याचे दिसत असून उर्वरित विभागात तुटीचा पाऊस आहे. पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली:
विदर्भातील धरणांच्या जलसाठ्याची स्थिती बघता पश्चिम विदर्भातील स्थिती चांगली आहे.

अमरावती विभागात ६९.६१ टक्के जलसाठा आहे. अमरावती विभागातील २६१ प्रकल्पांची एकूण ३ हजार ७७४ दशलक्ष घनमीटर क्षमता असून २ हजार ६२७ दलघमी जलसाठा शिल्लक आहे. राज्यात सर्वाधिक जलसाठा असणाऱ्या नागपूर विभागातील ३८३ प्रकल्पांची एकूण ४ हजार ६०६ दलघमी जलसाठा क्षमता आहे. त्यात ३ हजार ५८१ दलघमी जलसाठा आहे.
मराठवाडा विभागाची स्थिती गंभीर:


छत्रपती संभाजीनगर विभागात प्रकल्पामध्ये केवळ ३१.६१ टक्के जलसाठा असल्याची स्थिती असून, मागील वर्षी ती ७४.६४ टक्के एवढी होती. त्यामुळे आता जर पुढील दिवसांत पाऊस न झाल्यास मराठवाड्यातील नागरिकांना पुन्हा एकदा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान पावसाळ्याचे सुमारे ३ महिने उलटून गेले आहेत. आता पावसाळ्याचा केवळ एक महिना उरला असून, आता किती टक्के पाऊस पडतो आणि किती टक्के जलसाठा प्रकल्पांमध्ये साठवला जातो यावर पुढील जलसाठ्याचे गणित ठरणार आहे.


प्रकल्पांची सद्यस्थिती
विभाग टक्केवारी
कोकण : ८८.२६
मराठवाडा : ३१.६१
नागपूर : ७७.७५
अमरावती : ६९.६१
नाशिक : ५८.६०
पुणे : ६८.७२

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here