सूळकूड’ पाणी योजनेचा हट्ट सोडा, अन्यथा रक्तपात मंत्री हसन मुश्रीफ यांचा इशारा

0
93

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

 इचलकरंजी महापालिकेने सूळकूड पाणी योजनेऐवजी ‘कृष्णा’ नदीवरून सुरू असलेली पाणी योजनाच पूर्ण करावी. सहा तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याने इचलकरंजीवासीयांनी ‘सूळकूड’ योजनेचा हट्ट सोडावा, अन्यथा रक्तपात होईल, असा इशारा वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठकीत दिला.

याबाबत दोन दिवसांत आपण व खासदार संजय मंडलिक, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यांना लोकभावना सांगू, तरीही निर्णय झाला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून रस्त्यावरील लढाईस सुरुवात करूया, असेही त्यांनी सांगितले. राज्य मंत्रीमंडळातील जबाबदार मंत्र्यानेच रक्तपाताची भाषा जाहीरपणे केल्याने आश्चर्य व्यक्त झाले.

दूधगंगा बचाव कृती समितीच्या वतीने शनिवारी शासकीय विश्रामगृहात सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते, त्यामध्ये मंत्री मुश्रीफ बोलत होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले, इचलकरंजीसाठी ‘कृष्णा’ नदीवरून नवीन १६ किलोमीटर पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे, केवळ ७ किलोमीटरचे काम राहिले असून ‘सूळकूड’साठी मंजूर झालेला निधी ही योजना पूर्ण करण्यासाठी वापरावा. ‘सूळकूड’मधून पाणी देण्याचा विषय संपला आहे, त्यावर आता कोणीही चर्चाच करू नये.

खासदार संजय मंडलिक म्हणाले, इचलकरंजीला पाणी देण्यास विरोध नाही, पण ते दूधगंगेतून देता येणार नाही. ‘धामणी’तून पाणी मिळणार असून पंचगंगेच्या प्रदूषणाबाबतही लवकरच निर्णय घेऊ. ११ सप्टेंबरला मुंबईत बैठक बोलावल्याचे समजते, त्याच दिवशी विराट मोर्चा काढूया.

‘शाहू’ कारखान्याचे अध्यक्ष समरजीत घाटगे म्हणाले, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पाण्याचे राजकारण सुरू आहे. रस्त्यावरच्या लढाईशिवाय वेदना कळणार नाहीत.कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील म्हणाले, निपाणी आणि चिकोडी तालुक्यातील ६७ गावे दूधगंगेच्या कार्यक्षेत्रात आहेत. या योजनेचा आम्हाला अधिक फटका बसणार असून तुमच्या लढ्यात सीमाभागातील बांधव खांद्याला खांदा लावून उभे राहतील.

आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘दत्त’ कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दूधगंगा बचाव कृती समितीचे निमंत्रक के.पी. पाटील, अंबरीश घाटगे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, उल्हास पाटील, उत्तम पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आमदार प्रकाश आबीटकर, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, वीरेंद्र मंडलिक, अनिल ढवण, भूषण पाटील, सागर कोंडेकर आदी उपस्थित होते.

इचलकरंजीच्या जनतेचा नव्हे नेत्यांचाच हट्ट
सूळकूड योजना रद्द झालीच पाहिजे, त्याचबरोबर दूधगंगेच्या गळतीसाठी प्रयत्न झाले पाहिजेत. ‘दूधगंगा’ धरणाचा मूळ आराखडा तपासण्याची वेळी आली असून इचलकरंजीच्या जनतेची मागणी नाही, तेथील नेत्यांचा हट्ट असल्याचे माजी आमदार संजय घाटगे यांनी सांगितले.

तुमची घाण धुण्यासाठी धरण बांधले का?

आमदार असताना जिल्हा नियोजनच्या बैठकीत प्रकाश आवाडे हे पंचगंगा धुण्यासाठी पाणी सोडण्याचे आग्रह करत होते. पण, तुमची घाण धुण्यासाठी आमच्या आईबाबाने धरण बांधले का, असा सवाल के. पी. पाटील यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here