कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो; राजेश क्षीरसागरांचे सतेज पाटीलांना आव्हान

0
140

कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : सत्तेवर असताना कामे करायची नाहीत आणि पैशाच्या जीवावर निवडणुका जिंकायच्या, जनतेत गैरसमज पसरवण्याचा उद्योग काहीजण करत आहेत.

अजून आम्ही ‘अटॅक’ केलेला नाही, ज्यावेळी करू त्यावेळी पळताभुई थोडी होईल, असा इशारा देत कोट्यवधी रुपयांची विकासकामे जिल्ह्यात सुरू असल्याने आगामी निवडणुकीत दोन खासदार आणि दहा आमदार महायुतीचे निवडून आणणारच, मग ‘ कोल्हापूर दक्षिण’मधून कोण कसा निवडून येतो, तेच बघतो, असे थेट आव्हान राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांना नाव न घेता रविवारी पत्रकार परिषदेत दिले.

राजेश क्षीरसागर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरात विकासकामांचा धडाका लावला आहे. अद्ययावत फुटबॉल मैदानासाठी शेंडा पार्क येथे २० एकर जागा निश्चित केली असून, आर्किटेक्टची नेमणूकही केली आहे. शहरातील कामांचे श्रेय काहीजण घेत आहेत; पण कागदे दाखवून निधी येत नाही.

दिवसभर बसून आणावा लागतो. राधानगरी येथे सैनिक स्कूल करणार आहे. ठाण्यानंतर शिवसेनेची कोल्हापुरात अधिक ताकद आहे. खंडपीठासह जनहिताचे निर्णय झाल्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाणार नसून कोल्हापूर महापालिकेवर शिवसेनेचा पहिला महापौर केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, त्यासाठी प्रसंगी आर या पारची लढाई करावी लागली तरी बेहत्तर.

‘व्ही. बी.’ संधी साधू

व्ही. बी. पाटील हे व्यवसायातून राजकारणात आलेले आहेत, ते कोल्हापूरच्या कोणत्या जनआंदोलनात होते? ते संधी साधू राजकारणी असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली.

कनव्हेशन सेंटरला वाढीव २४३ कोटीला मंजुरी

येथील उद्योजकांसह कलाप्रेमींची मागणीनुसार येथे १०० कोटींचे कनव्हेशन सेंटर उभा राहत आहे. त्यालाही काही जणांनी विरोध केला; पण ते काम थांबणार नाही उलट विस्तारीकरणासाठी २४३ कोटी निधीस मान्यता दिली असून, १५ दिवसांत त्याच टेंडर निघेल, असे क्षीरसागर यांनी सांगितले.

अंबाबाई मंदिर ड्रेनेजसाठी अडीच कोटी

अंबाबाई मंदिरात घाटी दरवाजा व विद्यापीठ हायस्कूलकडून येताना घाण वास येतो. मात्र, यापूर्वी अनेकजण पालकमंत्री झाले, त्यांना तो आला नाही, ते अंबाबाईजवळ जाऊन नुसते पैसे मागत होते. ड्रेनेज लाइनसाठी जिल्हा नियोजनमधून आम्ही अडीच कोटी रुपये मंजूर केल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here