प्रतिनिधी रोहित डवरी
आमदार अमल महाडिक व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात
कोल्हापूर दि. 26 : आजच्या 75 व्या भारतीय संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना
शुभेच्छा देऊन संविधान प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन केले. भारतीय संविधानाबाबत समाजामध्ये जनजागृती व्हावी, याकरिता सामाजिक न्याय विभागाच्या वतीने आयोजित महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थ्यांच्या सहभागातून काढण्यात आलेल्या प्रभात फेरीला आमदार अमल महाडिक व जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. दिघे फौंडेशनच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना संविधान पुस्तकाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
आमदार अमल महाडिक यांनी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, देशभरात आज संविधान दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. संविधान निर्मात्यांनी अतिशय कष्टाने देश घडवण्यासाठी निर्माण केलेल्या भारतीय संविधानाचे पावित्र्य जपणे आवश्यक आहे. यासाठी संविधानातील मूल्यांचे आचरण करणे गरजेचे आहे. आपल्या संविधानात नागरिकांचे मूलभूत हक्क व अधिकारांचा अंतर्भाव आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद लोकशाही, गणराज्य आदी संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये समाविष्ट असून याचा सर्व नागरिकांनी अवलंब केला पाहिजे.
यावेळी काढण्यात आलेली ही प्रभात फेरी बिंदू चौकातून महामानवांच्या प्रतिमेस अभिवादन करुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, महानगरपालिका आवारातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, गंगाराम कांबळे स्मृतीस्थळ येथून सीपीआर मार्गे दसरा चौक येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मार्गस्थ झाली.
या प्रभात फेरीमध्ये मेन राजाराम कॉलेज, देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स, सहायक आयुक्त अधिनस्त १२५ वी जयंती मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह, गुणवंत मुलांचे वसतीगृह दसरा चौक, शासकीय मुलांचे वसतीगृह पाचगाव तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील इतर महाविद्यालये सहभागी झाली. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते बाळासो भोसले, डी.जी भास्कर, नामदेव कांबळे ,बबन रानगे, सुशील कोलटकर, सदानंद दिघे, पत्रकार, महानगरपालिका, पोलीस, वाहतूक नियंत्रण कक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादूत सहभागी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले. प्रभात फेरीची सांगता दसरा चौकात झाली.