
शाहुवाडी प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूर पोलिसांचा कौशल्यपूर्ण तपास — आरोपीला अखेर गजाआड!
दुर्गम निनाई परळी (गोळवण वस्ती) येथे घडलेल्या वृद्ध दांपत्याच्या दुहेरी हत्येच्या प्रकरणाचा कोल्हापूर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून अवघ्या काही दिवसांत उलगडा केला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे सराईत गुन्हेगार विजय मधुकर गुरव (रा. शिरगाव, ता. शाहुवाडी) यास गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
🔍 घटनाक्रम
दि. १९ ऑक्टोबर रोजी निनु यशवंत कंक (७०) आणि सौ. रखुबाई निनु कंक (६५) हे वृद्ध दांपत्य घराबाहेर मृत अवस्थेत आढळून आले.
प्रथमदर्शनी ही घटना हिंस्त्र श्वापदाच्या हल्ल्यातील असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. मात्र घटनास्थळाची तपासणी, मृतदेहांची स्थिती व परिसरातील परिस्थिती पाहता पोलिसांनी हत्या झाल्याची शक्यता गृहीत धरली.
🧩 अतिशय सूक्ष्म तपासातून सत्याचा शोध
मा. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने घटनास्थळाचा सखोल तपास सुरू केला.
पथकात पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अंमलदार हिंदुराव केसरे, राम कोळी, सुरेश पाटील, रुपेश माने, विनोद कांबळे, राजेंद्र वरंडेकर, अमित सर्जे आदींचा समावेश होता.
वनविभागाशी समन्वय साधून, तांत्रिक माहितीचे विश्लेषण आणि स्थानिक सूत्रांद्वारे मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढला.
🚨 गुन्ह्याचा उलगडा
सराईत आरोपी विजय गुरव हा विविध मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांत वॉरंटवरील पाहिजे आरोपी होता. पोलिसांच्या कारवाईपासून बचाव करण्यासाठी तो डोंगरकपारीत लपून राहत होता. निनाई परळी येथील वृद्ध दांपत्याच्या घरी आश्रय व जेवणासाठी तो गेला असता निनु कंक यांनी त्यास नकार दिला.
यातून चिडून त्याने लाकडी दांडक्याने व दगडाने दोघांचा निर्दयीपणे खून केला, अशी त्याने चौकशीत कबुली दिली.
⚖️ तपास जलदगतीने सुरू
या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीस शाहुवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील चौकशी तीव्र गतीने सुरू आहे.
💬 कोल्हापूर पोलिसांचा पराक्रम
दुर्गम भागात, मर्यादित साधनसंपत्तीमध्ये आणि अत्यंत कठीण परिस्थितीत केलेल्या या तपासामुळे कोल्हापूर पोलीस दलाने पुन्हा एकदा आपल्या कौशल्य, चिकाटी आणि जनतेच्या सुरक्षेसाठी असलेल्या निष्ठेची प्रचीती दिली आहे.

