
प्रतिनिधी: प्रा. मेघा पाटील
कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रताप (बापू) कोंडेकर यांच्या पुढाकाराने सन २००२ ते २००७ या कालावधीत कार्यरत असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख योजनांची आठवण करून देणारा आणि जनसेवेची नवी प्रेरणा देणारा असा हा सोहळा ठरला.

या कार्यक्रमातून ग्रामीण विकास, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते आदी क्षेत्रांत जिल्हा परिषदेने केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. माजी लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकाळातील अनुभव सांगत प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वय किती महत्त्वाचा आहे, यावर प्रकाश टाकला. अशा कार्यक्रमांमुळे समाज, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील नाते अधिक दृढ होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

या गौरव सोहळ्यास राज्याचे आरोग्य मंत्री मा. श्री. प्रकाश आबिटकर, मा. खासदार श्री. संजय मंडलिक, श्री. डी. सी. पाटील, माजी आमदार श्री. सत्यजीत पाटील (आबा), श्री. के. एस. चौगुले, सौ. मनीषा गोविंद गुरव, श्री. शामराव सूर्यवंशी, श्री. शामराव जिनाप्पा गायकवाड, श्री. दत्ताजी बंडोजी घाटगे, श्री. डी. आर. पाटील, श्री. विलास गणपती कांबळे, श्री. जगदीश लिंग्रस आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांनी आपल्या भाषणातून जिल्हा परिषदेच्या कार्याची प्रशंसा करत ग्रामीण भागाच्या विकासासाठी अशा अनुभवी माजी लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन आजच्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल, असे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी सदस्य व पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. हा सोहळा केवळ सत्कारापुरता मर्यादित न राहता जनसेवेची प्रेरणा देणारा आणि भविष्यातील विकासासाठी सकारात्मक ऊर्जा देणारा ठरला.


