
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. 18 (जिमाका) : अल्पसंख्याक समुदायासाठी राज्य व केंद्र शासनाच्या अनेक विविध योजना कार्यरत आहेत. या योजनांचा लाभ समुदायाने घेऊन स्व:हित साधावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. महाराणी ताराबाई सभागृहात जिल्हा नियोजन विभाग व जिल्हा अल्पसंख्यांक कक्ष (जिल्हाधिकारी कार्यालय) यांच्या संयुक्त विद्यमाने आज अल्पसंख्यांक हक्क दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मंचावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद) संतोष जोशी, जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, पी.एस.आय. किरण कागलकर, शिक्षणाधिकारी (निरंतर) श्रीमती अनुराधा मेत्रे, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक उदय कांबळे, शिवाजी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अविनाश भाले व सहाय्यक कृषी अधिकारी संदीप कांबळे आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले, अल्पसंख्यांक समुदायातील युवकांनी शासकीय नोकरीत येण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच जागतिक शिक्षणामध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा विचार करता मदरशामधून इंग्रजी भाषेचा वापर व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अल्पसंख्यांक समुदायाला मुख्य सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी एकत्रित येऊन कार्यरत राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.
यावेळी श्री. कांबळे, श्री. भाले, श्रीमती मेत्रे तसेच श्री. संदीप कांबळे यांनी अल्पसंख्यांक समुदायासाठी असणाऱ्या विविध योजनांबाबत उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमात अनिल गडकर, दस्तगीर मुल्ला, पीटर डिसूझा, तय्यब कुरेशी आदींनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी अल्पसंख्यांक हक्क समितीत अशासकीय सदस्यांची नेमणूक करावी, गरजू विद्यार्थ्यांना वाढीव शैक्षणिक कर्ज मिळावे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात अल्पसंख्यांक समुदायाच्या नियमित बैठका घेऊन अडचणी व प्रश्न जाणून घ्यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मकता दर्शवित सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांच्या या जिल्ह्यात सामाजिक समतोल राखणे हे प्रशासनाचे प्राधान्य राहील.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी केले, तर सचिन परब यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमासाठी रोजगार-स्वयंरोजगार कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जमीर करीम, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग अधिकारी बालाजी बिराजदार, समीर मुल्ला यांच्यासह इतर विभागांचे अधिकारी, अल्पसंख्यांक समुदायातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


