प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याने महायुतीला भरघोस यश दिल्यानंतर महायुतीतील वरिष्ठ नेते कोल्हापूरच्या पदरात काय पडणार यांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोल्हापूर जिल्ह्याला किती मंत्रिपदे मिळणार याची चर्चा होताना दिसत आहे. महायुतीला भाजप अपक्षसह तीन , जनसुराज्य दोन, शिवसेना तीन आणि राष्ट्रवादीला एक असे संख्याबळ झाले असताना त्याला किती कॅबिनेट मंत्रीपद आणि राज्यमंत्रीपद मिळणार याचे आडाखे बांधले जात आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार १४ डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या विस्तारात कोल्हापूर जिल्ह्याला दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर आत्मविश्वास निर्माण झाला आहे महाविकास आघाडीचा मात्र विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. महायुतीला दहा पैकी दहा जागांवर यश मिळाले.
कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. मात्र चंदगडचे महायुतीचे उमेदवार राजेश पाटील यांचा पराभव झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. मात्र हसन मुश्रीफ यांचा पूर्वानुभव व सलग सहाव्यांदा आमदार झाल्याने त्यांच्या मंत्रीपदावर शिक्कामोर्तब केला जाण्याची शक्यता आहे.शिवसेना शिंदे गटांमध्ये मंत्रीपदासाठी तीन आमदारांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश अबिटकर हे सलग तीन वेळा आमदार झालेत. शिवाय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नामदार करण्याचा शब्द राधानगरी विधानसभा मतदारसंघातील जनतेला दिल्याने त्यांच्या नजरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लागलेल्या आहेत.
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे कोल्हापूर उत्तर मधून आमदार झालेत. यापूर्वी त्यांना राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष पद दिले आहे. ते देखील मंत्रीपदासाठी आग्रही आहेत. करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रदीप हे देखील आग्रही आहेत. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणाच्या गळ्यात कॅबिनेट मंत्रीपदाची माळ टाकणार हे पहावे लागणार आहे.जिल्ह्यात भाजपचे दोन आमदार असून त्यांचा घटक पक्ष असलेला जनसुराज्य शक्ती पक्षाचेही दोन आमदार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कॅबिनेट मंत्रिपदावर आमदार विनय कोरे राहिले आहेत. त्यामुळे त्यांच्या पाठीशी अनुभव आहे.
भाजपचे अमल महाडिक हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून कोणाच्या नावाला पसंती मिळणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.