सेवानिवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे निधन

0
62

प्रतिनिधी बाहुबली भुसे

: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सेवानिवृत्त माहिती उपसंचालक डॉ. संभाजी खराट यांचे अल्पशा आजाराने सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथील नाणेश रुग्णालयामध्ये ‍निधन झाले. डॉ. संभाजी खराट दि. 31 जानेवारी 2023 रोजी उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथून सेवानिवृत्त झाले होते.
डॉ. खराट यांच्या नोकरीची सुरुवात कोल्हापूर येथूनच झाली होती. सन 1998 ला ते विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे सहायक संचालक या पदावर रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी व ठाणे येथे
जिल्हा माहिती अधिकारी म्हणून तर माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय मुंबई येथे वरिष्ठ सहायक संचालक म्हणून सेवा बजावल्यानंतर पदोन्नतीने ते दि.10 ऑक्टोबर 2021 रोजी उपसंचालक (माहिती) विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर येथे रुजू झाले होते.
डॉ. खराट हे अत्यंत वाचनप्रिय, उत्कृष्ट संपादन कौशल्य असलेले लेखन म्हणूनही परिचित होते. तसेच ते महात्मा फुले यांचे अभ्यासक होते. त्यांनी महात्मा फुले व इतर विषयावर 30 हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. उत्कृष्ट उत्कृष्ट वाडमय निर्मितीसाठी त्यांना शासनाचे दोन पुरस्कार, उत्कृष्ट पुस्तकासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पुरस्कार, डॉ.आंबेडकर पुरस्कार, शब्दशिल्प पुरस्कार तसेच चौथा स्तंभ पुरस्कारासह अन्यही पुरस्कार मिळाले आहेत. युवकांसाठी साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना केंद्र शासनाचा नेहरु युवा पुरस्कारही प्राप्त झाला होता.

लातूर येथे फेब्रुवारी 2013 मध्ये झालेल्या आठव्या सत्यशोधकी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात रुजू होण्यापूर्वी त्यांनी औरंगाबाद येथील दैनिक मराठवाडा व दैनिक तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम केले होते. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागात पाच वर्षे मानद प्राध्यापक म्हणून सेवा बजावली होती. त्यांनी अनेक विषयांवर लेखन व माहितीपटांची निर्मिती केली होती. राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या लोकराज्य मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काही वर्षे काम पाहिले होते. अनेक वृत्तपत्रांच्या पुरवण्यांसाठी, दिवाळी अंकांसाठी लेखन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here