कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत पक्षात मोठी बंडखोरी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अर्थ खात्याचा कार्यभारही अजित पवारांकडे देण्यात आला. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील नेते अधूनमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
मात्र, यातच आता भाजपसोबत जाण्यापूर्वी अजित पवार यांनी ऑफर दिली होती का, याबाबत रोहित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली.
मी अजित पवारांचा पुतण्या आहे. वैयक्तिक स्तरावर काका म्हणून मला त्यांचा आदर आहे. पण त्यांनी जी राजकीय विचारसरणी निवडली आहे किंवा ते ज्या भाजपच्या प्रतिगामी विचारसरणीबरोबर गेले आहेत.
तो विचार मला आवडत नाही. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून संघर्ष नक्कीच होणार आहे. माझी भूमिका इतकी स्पष्ट आहे की अजित पवार यांनी मला विचारलेच नाही, असे रोहित पवार यांनी सांगितले.
त्या वातावरणात कधी कधी स्वत:वरचे नियंत्रण जाऊ शकते
वय झाले, कुठेतरी थांबायला पाहिजे, असे अजित पवार हे शरद पवारांना उद्देशून म्हणाले होते. यावर बोलताना, अजित पवारांच्या वक्तव्याकडे मी कसा बघतो? हे बघण्यापेक्षा प्रेक्षकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला ते बघा. पण पवार म्हणून मला ती गोष्ट आवडली नाही. १०० टक्के आवडली नाही. स्वत: अजित पवारांनाही ते वक्तव्य आवडले नसावे.
पण त्यांच्या आधी भाषण करणाऱ्या लोकांनी मन मोकळे झाल पाहिजे, अशाप्रकारे भाषण केले. त्या वातावरणात कधी कधी स्वत:वरचं नियंत्रण जाऊ शकते, असे रोहित पवार म्हणाले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
दरम्यान, १९९९ साली शरद पवार यांना पंतप्रधान करावे या भूमिकेतून त्यांच्या सोबत गेलो. आजपर्यंत त्यांना साथ दिली. भविष्यात पुढच्या पिढीचा विचार करता महाराष्ट्रात अजित पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय असेल, असे मला वाटत नाही.
राज्याचा विकास सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहे. तो आम्ही करत राहू. त्याच पद्धतीने अजितदादांना साथ देत राहणार आहे.
योग्य वेळ आल्यावर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे. त्यासाठी आम्ही आगामी काळात प्रयत्नशील राहणार आहोत. कार्यकर्त्यांनी खंबीर साथ द्यावी, असे आवाहन रामराजे निंबाळकर यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले.