
कोल्हापूर : कोल्हापुरातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. संतोष प्रभू व डॉ. सुजाता प्रभू यांच्या विन्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. या उद्घाटन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी देखील उपस्थित राहून पुढील वैद्यकीय सेवेसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पाच दशकाहून अधिक काळ कोल्हापूरच्या आरोग्य विश्वात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विन्स हॉस्पिटल्सच्या व्यवस्थापकांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पश्चिम महाराष्ट्रासह कोकण व कर्नाटक परिसरामध्ये डॉ. प्रभू हे मेंदूतज्ञ डॉक्टर म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतात वैद्यकीय उपचार आणि स्वस्त औषधे असल्याने इतर विकसित देशांच्या तुलनेत येथील वैद्यकीय क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शल्यविशारदांमध्ये कोल्हापूरचे डॉ. संतोष प्रभू यांचे नाव अग्रस्थानी आहे. आपल्या कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांनी कोल्हापूरला जागतिक वैद्यकीय पर्यटनाच्या नकाशावर स्थान मिळवून दिले आहे. डॉ. प्रभू यांच्या ‘वेस्टर्न इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसर्जरी’ (विन्स) या संस्थेचा आता अधिक विस्तार होत आहे.
यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, प्रतापसिंह जाधव, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, सत्यजित कदम, राहुल चिकोडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.