
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उच्च शिक्षण मंत्री, राज्यपाल, जिल्हाधिकारी व कुलगुरूंना निवेदन

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे
कोल्हापूर, दि. १७: छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आणि आत्मीयता आहेत. हे नाव हृदयात व मनामनात आदरपूर्वक वसलेले आहे. त्यामुळे विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ हेच प्रचलित नाव राहू द्या, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे व कुलगुरू डी. टी. शिर्के यांना निवेदने देण्यात आली. निवेदनावर कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, केडीसीसी बँकेचे संचालक व विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य प्रताप उर्फ भैया माने, कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदिल फरास, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील आदी प्रमुखांच्या सह्या आहेत. निवेदनात म्हटले आहे, 18 नोव्हेंबर 1962 साली शिवाजी विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. डॉ. बाळकृष्ण यांच्या इच्छेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे विद्यापीठ स्थापन व्हावे असे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळामध्ये ठरले. आमदार बळवंतराव बराले यांचा आग्रह होता, की श्री. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामकरण व्हावे. परंतू; यशवंतराव चव्हाण यांच्यासह सर्व विचारवंतांनी इत्थंभूत विचार विनिमय करून असे नाव ठेवण्यामागील धोके ओळखून तसेच भविष्यकाळात विद्यापीठाच्या नावाचा अपभ्रंश प्रचलित होण्याचा धोका ओळखून ‘शिवाजी विद्यापीठ’ असेच नाव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज आपण अनेक विद्यापीठांच्या नावांचा अपभ्रंश प्रचलित झाल्याचे पहात आहोत. मुंबईतील प्रसिद्ध रेल्वे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे नाव CSMT या प्रकारेच घेतले जाते. अशाच प्रकारे आपल्या विद्यापीठाच्या नावाचा देखील भविष्यकाळात अपभ्रंश तयार होण्याचा धोका संभवतो. जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे नाव JNU असेच घेतले जाते. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाचे नाव SNDT असे उच्चारले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव BAMU या पद्धतीने घेतले जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर TECHNOLOGICAL युनिव्हर्सिटी नाव BATU असे उच्चारले जाते. इत्यादी अनेक उदाहरणे आपल्या समोर वरील गोष्टीची साक्ष देत असताना दिसतात. शिवाजी महाराज हे नाव अस्मितेचा व आत्मीयतेचा विषय आहे. हे नाव हृदयात व मनामनात आदरपूर्वक वसले आहे. काही संघटना आज नाव विस्ताराचा मुद्दा पुढे रेटताना दिसत आहेत. अशा अनेक संघटनांची नामांतराबाबतची निवेदने आपणास प्राप्त होतील. या नामांतरास आमचा तीव्र विरोध आहे व राहील. सबब नामांतराचा निर्णय घेण्यात येऊ नये. वरील सर्व गोष्टींचा विचार करून शिवाजी विद्यापीठ असेच नाव प्रचलित रहावे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे, सरचिटणीस संजय फराकटे, कागल शहराध्यक्ष संजय चितारी, हातकणंगले विधानसभा अध्यक्ष संभाजी पवार, हातकणंगले तालुकाध्यक्ष शिरीष देसाई, हर्षवर्धन चव्हाण, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देसाई, मुरगुड शहराध्यक्ष दिगंबर परीट, नगरसेवक प्रकाश गवंडी, नगरसेवक उत्तम कोराणे, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजी पाटील, सर्जेराव जरग, सुनील कांबळे, युवराज पाटील, बाळासो माने, बाळकृष्ण लोखंडे आदी प्रमुख उपस्थित होते. ………….. *कोल्हापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने शिवाजी विद्यापीठ हेच प्रचलित नाव ठेवा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, प्रताप उर्फ भैया माने व पदाधिकारी व कार्यकर्ते.यावेळी उपस्थित होते