डोंगराळ वस्ती ते मुंबई पोलिस दल – ज्योतीचा ‘खाकी’पर्यंतचा संघर्षमय प्रवास

0
9

चंदगड तालुक्याच्या दुर्गम आणि निसर्गरम्य पण कठीण अशा भागातील एक लहानशी वाडी – गुडवळे खालसा. त्यातही केंदळीतळे गावापासून ३ किलोमीटर आत वरची वस्ती – मोजकी दहा-पंधरा घरे, सततचा पाऊस, दाट धुके, हत्ती-बिबट्यांचा वावर आणि सापांचा धोका हे सगळं रोजचं जीवन.

या कठीण जीवनात वाढलेली ज्योती सुरेंद्र गवस, आज मुंबई पोलिस दलात कार्यरत आहे. तिच्या यशामागे वर्षानुवर्षांचा संघर्ष, आईची अपरंपार मेहनत, आणि स्वतःची न खचणारी जिद्द आहे.

वडाळ्यातून वाट सुरू झाली…

दर शनिवारी ‘हेरे’ आठवडी बाजारात जाणं ही एकमेव वाहतूक व्यवस्था. बाकीच्या दिवशी “धूमकेतू”सारखी दिसणारी पारगड बस. अशा परिस्थितीतही, धुमडेवाडीचे डॉ. प्रकाश पाटील गेली २० वर्ष गावोगाव फिरून वैद्यकीय सेवा देत आहेत. त्यांच्याच घरी भगतसिंग ॲकॅडमीचे होस्टेल, जिथे अकरावीत असतानाच ज्योतीला घेऊन आले. आणि इथून सुरू झाला तिचा खऱ्या अर्थाने “खाकीचा प्रवास”.

आईचा त्याग, मुलींचा संघर्ष

ज्योतीच्या आईने गावी काही होणार नाही हे ओळखून चंदगडमध्ये भाड्याने घर घेतले. स्वतः काजू फॅक्टरीत मजुरी करत उदरनिर्वाह सुरू केला. तीन मुलींचा सांभाळ करताना, मोठी मुलगीही छोट्या-मोठ्या कामांत मदत करू लागली.

भरतीची तयारी, अपयश आणि आशा

ज्योतीने १२वीला ८१% गुण मिळवून पाटणे कॉलेजमध्ये टॉप केलं, आणि हलकर्णी महाविद्यालयात B.A. सुरू केलं. तिचा भरती सराव सातत्याने चालूच होता. SSC GD भरतीत लेखी व मैदानी चाचणी पास, पण मेडिकलमध्ये अनफिट. कोरोना काळात विमानाने हैदराबादला जाऊन री-मेडिकल, पण अंतिम यादीत नाव नाही.

त्यानंतर महाराष्ट्र पोलीस भरती, तिथेही कधी ग्राउंड तर कधी लेखी परीक्षा, तर कधी बदललेल्या नियमांमुळे नुकसान. आरक्षणातील बदल, SEBC चा गोंधळ, आईचा अपघात… या सगळ्याने आयुष्याचं गणितच कोलमडलं. पण ज्योतीने पुण्याला जाऊन पार्ट-टाईम जॉब करत अभ्यास सुरू ठेवला.

आणि अखेर खाकी मिळाली!

या सगळ्या अडथळ्यांच्या शर्यतीत अखेर विजय मिळवला. महाराष्ट्र पोलीस भरतीत यश मिळालं. खाकी वर्दी मिळाली.

भगतसिंग ॲकॅडमीच्या वतीने सत्कार करताना तिच्या डोळ्यांतून आलेले अश्रू म्हणजे संघर्षाचं, जिद्दीचं, यशाचं प्रतीक होतं. त्या अश्रूंमध्ये तिचं सगळं आयुष्य भरलेलं होतं – आईच्या कष्टाचं, उपासमारलेल्या दिवसांचं, अपयशाचं आणि अखेर मिळालेल्या यशाचं.

देणं लागतो आपण घडलेल्या ठिकाणाला…

खाकी मिळाल्यावर तिने आपल्या मुळाशी कधीही दुरावलेली नाही. “आपण जिथे घडलो त्या अकॅडमीचं काहीतरी देणं लागतो…” या भावनेतून तिने भगतसिंग ॲकॅडमीच्या वाचनकट्ट्यासाठी १०,००० रु. देऊन पुस्तके घेण्यास सांगितली, जेणेकरून तिच्यासारख्या आणखी ज्योती घडाव्यात.

प्रेरणादायी प्रकाशवाट

ज्योती गवस हिची कहाणी कोणत्याही ग्रामीण, गरीब पण जिद्दी तरुणासाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी इच्छाशक्ती, चिकाटी आणि मेहनतीमुळे खाकीवर्दीपर्यंतचा प्रवास शक्य होतो, हे तिचं आयुष्य सांगून जातं.


“ज्याला यश मिळवायचंच आहे, त्याला मार्ग सापडतोच… आणि संघर्षाच्या धगधगत्या वळणांवरून चालत गेलेल्या ज्योतीसारख्याच मुली नव्या उजेडाची आशा बनतात.”


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here