कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
गारगोटी- बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि माजी आमदार के.पी.पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री तर मंत्री हसन मुश्रीफ यांना उपमुख्यमंत्री करण्याचा मनोदय बोलून दाखवीत आम्ही अजितदादा पवार गटासोबत असल्याचे प्रथमच जाहीर केले.
ते कोल्हापूर येथे शुक्रवारी झालेल्या नियोजन सभेत बोलत होते.अखेर माजी आमदार पाटील यांच्या पाठिंब्याचा गुलदस्ता खुला झाला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत माजी आमदार केपी पाटील राहिले आहेत.त्यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद सांभाळले आहे.दोन वेळा आमदार झाल्यानंतर ते राष्ट्रवादी सोबतच होते.
पण राष्ट्रवादी पक्षातून अजित पवार एक गट घेऊन बाहेर पडल्यानंतर राज्यात या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गोची झाली आहे.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील यांचे सख्य सुरवातीपासून अजित पवार यांच्यासोबत असल्याने त्यांनी तातडीने अजित पवार यांच्यासोबत असल्याचे जाहीर केले.पण भुदरगड तालुक्यातील माजी आमदार पाटील यांनी आपल्या गटाची भूमिका गुलदस्त्यात ठेवली होती.
ते गुप्तपणे मंत्री मुश्रीफ यांनी कागल येथील शासकीय विश्रामधामवर भेट घेतली होती.तर अजित पवार यांचीही भेट घेतल्याचे चर्चा गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सुरू होती.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर कोणत्या गटात जायचे याचे गेले दोन महिने निश्चित होत नव्हते.अखेर अजितदादांच्या दहा सप्टेंबर रोजी होणाऱ्या सभेचे नियोजन करण्यासाठी आज शुक्रवारी कोल्हापुरात नियोजन बैठक बोलवण्यात आली होती.
त्या बैठकीत केपी पाटील यांनी आपण अजितदादांच्या गटात सामील होण्याचे नियोजनावर शिक्कामोर्तब केले.
जुलै महिन्याच्या चार तारखेला माजी आमदार केपी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजितदादांच्या सोबत जायचं? याचा निर्णय घ्यायचा होता.
बैठकीचा सुर थोरल्या पवारां सोबत जाण्यासाठी उमटू लागला होता.त्यावेळी माजी आमदार केपी यांनी आपली भूमिका नंतर स्पष्ट करणार असल्याचे जाहीर केले.कदाचित त्यांना अजित पवार यांच्यासोबत जायचं असेल आणि बैठकीतील सुर शरद पवार यांच्याकडे असल्याने त्यांनी भूमिका स्पष्ट केली नसावी.
मंत्री हसन मुश्रीफ यांची मैत्री आणि बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प शासन दरबारी अडकल्याने त्यांनी अजित पवार यांच्या सोबत जाण्याची भूमिका घेतली असेल.
आज कोल्हापुरात झालेल्या नियोजनाच्या बैठकीत अजितदादांच्या सोबत जाण्याचा आपला सुर एकदा आळवला.गेल्या आठवड्यात गारगोटी येथे आमदार रोहित पवार यांच्या बैठकीला गैरहजेरी आणि शरद पवार यांच्या कोल्हापूर सभेकडे पाठ केल्याने ते कोठे जाणार हे निश्चित होते.
परंतु त्यांनी कोठेही जाहीरपणे वक्तव्य केले नव्हते.आजच्या बैठकीत निर्णय घेतल्याने आता केपी पाटील हे अजित पवार यांच्या गोटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले आहे.