कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : सरकारच्या लेखी मराठा समाजाला काहीच किंमत राहिली नसून अंतरवाली सराटी (ता.अंबड, जि.जालना) येथे मराठा समाजावर झालेला लाठीचार्ज हा जालियनवालाबाग हत्याकांडसारखाच प्रकार आहे.
सरकारने यातील मेजर जनरल डायरचा शोध घ्यावा, अशा शब्दांत कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी शिक्षणमंत्री, तथा कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमोर संताप व्यक्त केला.
सकल मराठा समाजाने कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री केसरकर यांना जालन्यातील घटनेचा जाब विचारत निषेध व्यक्त केला. मागण्यांचे निवेदनही केसरकर यांना दिले.
बाबा इंदूलकर म्हणाले, जालन्यातील घटनेत पोलिसांनी समाजाच्या लोकांना जनावरासारखे मारले आहे. सरकारच्यालेखी मराठ्यांची किंमत उरली नसून मराठाद्वेषी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे. ही घटना जालियनवालाबाग हत्याकांडासारखी आहे.
त्यामुळे या घटनेतील मेजर जनरल डायर कोण आहे, याचा शोध घ्या. यावेळी बाबा पार्टे, अनिल घाटगे, महादेव पाटील, काका पाटील, सतीश नलवडे,अमरसिंह निंबाळकर उपस्थित होते.
बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातला –मंत्री केसरकर
मराठा समाजाने याआधी शांततेत मोर्चे काढून जगभर आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे अंतरवाली सराटीत घडलेल्या घटनेत या समाजाचा हात नसून बाहेरच्या लोकांनीच गोंधळ घातल्याचा आरोप मंत्री केसरकर यांनी केला.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सकारात्मक असून त्यादृष्टीने पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.