
इचलकरंजी प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
: शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आयुष्यभर घाणीमध्ये उतरून काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आज निवृत्तीनंतरही न्याय मिळत नसल्याचा धक्कादायक प्रकार इचलकरंजी महानगरपालिकेत उघडकीस आला आहे. तब्बल ६० ते ७० पेक्षा अधिक निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांचे ग्रॅज्युटी, फंड सर्विस, अर्जित रजेचा पगार यांसारखे कायदेशीर लाभ गेली १ ते ५ वर्षे थकीतच आहेत.
सेवानिवृत्ती नंतर ठराविक कालावधीत रक्कम देणे महानगरपालिकेची कायदेशीर जबाबदारी असताना ३१ ऑक्टोबर २०२४ पासून आजपर्यंत एकाही कर्मचाऱ्याला त्यांचा हक्काचा एक रुपयादेखील मिळाला नाही, अशी संतापजनक माहिती समोर आली आहे.
कर्मचाऱ्यांनी वारंवार प्रशासक आणि संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी केली तरी “निधी नाही” या कारणावरच सर्व काही थांबले आहे. आश्चर्य म्हणजे—
आयुक्तांचा बंगला बांधण्यासाठी निधी मिळतो, रस्तेसाठी निधी मिळतो, पण आयुष्यभर शहर स्वच्छ करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशासाठी निधी नाही…?
असा संतप्त सवाल भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन महाराष्ट्राचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुर्यकांत दशरथ देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
कित्येक कर्मचाऱ्यांचे सोसायटीचे कर्ज थांबले असून त्यावरील व्याज रोज वाढत आहे. आर्थिक संकटामुळे अनेक कुटुंबे बिकट परिस्थितीत सापडली आहेत.
देशमुख यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,
“जर तात्काळ थकीत रक्कम अदा झाली नाही तर संघटनेतर्फे तीव्र जनआंदोलन करण्यात येईल आणि कायदेशीर लढाही उभारला जाईल.”
निधी नसल्याचे खोटे कारण देत निवृत्त कर्मचाऱ्यांच्या न्यायाला थांबवणाऱ्या महानगरपालिकेचा हा कारभार हा भ्रष्टाचार आणि निष्क्रियतेचा गंभीर नमुना आहे, असेही देशमुख यांनी ठणकावून सांगितले.
निवृत्त सफाई कर्मचाऱ्यांची यादी पत्रासोबत महानगरपालिकेला देण्यात आली असून तात्काळ न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

