
प्रतिनिधी : जानवी घोगळे
कोल्हापूर, दि. ०६ : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील पत्रकारांशी विशेष संवाद साधण्यात आला. पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली भेटीदरम्यान ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व, ‘स्मॉल स्केल’ वृत्तपत्रांचे योगदान आणि सध्याच्या युगातील ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘ऑल रजिस्टर्ड न्यूज पेपर’स् असोसिएशन’तर्फे पत्रकार दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथील के. सखाराम रामचंद्र बुरांडे ग्रंथालयात पार पडला. पत्रकार दिनाचा ऐतिहासिक संदर्भ, मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ व पत्रकारितेची लोकशाहीतील भूमिका याविषयी थोडक्यात माहिती देत समाजजीवन घडविण्यात मुक्त व जवाबदार पत्रकारितेचे स्थान उपसंचालक प्रवीण टाके यांच्या कडून अधोरेखित करण्यात आले. यावेळी ग्रामीण पत्रकारितेत कार्यरत आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजयकुमार पोतदार, डॉ. सागर बोराडे, दीपक ढवळे, धोंदिराम शिंदे, मकरंद बुरांडे, दीपक बळे, विजयकुमार पोतदार उपस्थित होते.

सहभागी पत्रकारांनीही प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शासन–प्रशासन आणि माध्यम यांचा परस्पर समन्वय अधिक प्रभावी करण्याबाबत आपले मत मांडले. शेवटी असोसिएशनच्यावतीने उपस्थित मान्यवरांचे आभार मानून पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि भविष्यात अशा प्रकारचे मार्गदर्शक कार्यक्रम सातत्याने घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
कोडोली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा
पत्रकार दिनानिमित्त वारणा नगर येथील स्थानिक पत्रकार आणि राज्य स्तरीय पत्रकार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. असोसिएशन ऑफ स्मॉल अंड मीडियम न्यूज़ पेपर्स ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सचिव तसेच वारणेचा वाघ या साप्ताहिकाचे संपादक प्रवीण पाटील यांनी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ग्रामीण पत्रकारितेचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रश्न मांडण्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी स्थानिक आणि लघु वृत्तपत्रे महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. साप्ताहिक वारणेचा वाघ व वारणा कोडोली पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी वारणा कोडोली परिसरातील ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाटील ( तरुण भारत), संजय पाटील (दैनिक सकाळ), आनंदा वायदंडे (दैनिक लोकमत), प्रवीण पाटील (साप्ताहिक वारणेचा वाघ), संजय भोसले ( दैनिक पुढारी), राजकुमार जाधव (बी न्यूज), शिवकुमार सोने (दैनिक पुण्यनगरी) बाबासो कावळे (दैनिक पुढारी), विलास पाटील (दैनिक महान कार्य ) बाबासो माने(दैनिक पुण्यनगरी), रवींद्र पवार (दैनिक लोकमत) बाबासो जाधव (साप्ताहिक शांती टाइम्स) सनी काळे( के.के. न्यूज ) उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या संवाद कार्यक्रमात बदलत्या काळातील पत्रकारिता आणि तंत्रज्ञान यावर भर देण्यात आला. आजच्या डिजिटल युगात पत्रकारितेवर होणारा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ अर्थात ‘एआय’चा प्रभाव आणि त्याचा वापर या विषयावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला. उपसंचालक प्रवीण टाके आणि जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याबाबत आणि शासकीय योजनांच्या प्रसिद्धीबाबत मार्गदर्शन केले. या आगळ्यावेगळ्या संवाद उपक्रमाचे स्थानिक पत्रकारांनी स्वागत केले आहे.


