
प्रतिनिधी : प्रमोद पाटील
विधान परिषद सभापती राम शिंदे यांची ग्वाही पोंभुर्ले (देवगड): माय मराठी पत्रकारितेचा पाया घालणारे, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे प्रत्येक मराठी माणसाच्या अभिमानाचे प्रतीक आहेत. त्यांच्या स्मृती व कार्याशी निगडित उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल, अशी ठाम ग्वाही विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी दिली.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बेडकीहाळ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संस्थेच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेताना त्यांनी, “आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव हे पत्रकारांसाठी नेहमीच प्रेरणास्थान राहील” असे सांगून आगामी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी त्यांनी संपादित केलेल्या दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या तीन खंडांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यंदाचा राज्यस्तरीय दर्पण पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार राजू साबळे, दैनिक सिंधुदुर्ग समाचार – मँगो एफ.एम.चे आशिष कदम, प्रजावाणीचे शंतनू डोईफोडे, गजानन शिंदे, जीवनराव चव्हाण, प्रकाश कुलथे, विजय पालकर, श्रीराम जोशी, युवराज पाटील आणि डॉ. अनिल काळबांडे यांचा शाल – स्मृतिचिन्ह देवून गौरव करण्यात आला .हा सोहळा सत्कारमूर्तींचा गौरव हा पत्रकारांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असे मत दूरदर्शनचे माजी सहाय्यक केंद्र संचालक जयू भाटकर यांनी व्यक्त केले. सत्कारमूर्तींच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार राजीव साबळे आणि बसवेश्वर चिंदगे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शिवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ .मोहन दहिवर, सरपंच प्रियंका धावडे, माजी आमदार प्रमोद जठार, उपसरपंच सादिक डोंगरकर, जांभेकर परिवारातील मधुकर व सुधाकर जांभेकर, तसेच पंचक्रोशीतील पत्रकार, प्रशासकीय अधिकारी व विविध माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पारंपरिक वाद्याच्या गजरात निघालेली पालखी आणि दांड पट्ट्याची प्रात्यक्षिके आणि कोकणी भोजनाचा सारवलेल्या घरात आस्वाद अशा विविध पैलूंनी हा सोहळा पत्रकार – माध्यम विश्वाचा एक साहित्य संमेलन सोहळा ठरला .





