
पन्हाळा प्रतिनिधी : पांडुरंग फिरींगे
निवडे–मोरेवाडी परिसरात प्रस्तावित दूध डेअरीच्या प्रक्रियेतून सहकार क्षेत्राला काळीमा फासणारा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, ग्रामपंचायत सरपंचांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बोगस दूध संकलनाचा दाखला दिल्याचा खळबळजनक आरोप होत आहे. प्रत्यक्ष वास्तव आणि कागदोपत्री दाखवलेले आकडे यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असल्याने गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महालक्ष्मी दूध संस्था, माहेश्वरी महिला दूध संस्था, श्री दत्त सहकारी दूध संस्था व महादेव सहकारी दूध संस्था (निवडे–मोरेवाडी) यांनी दूध डेअरी व्हावी म्हणून पाठिंबा दिला आहे. मात्र याच गावातील रंक भैरव सहकारी दूध संस्था मर्यादित, भैरवनाथ सहकारी दूध संस्था आणि हनुमान सहकारी दूध संस्था यांनी या संपूर्ण प्रक्रियेला ठाम विरोध दर्शवला आहे.
विरोध करणाऱ्या संस्थांचा आरोप आहे की, दूध संस्थेच्या नावाखाली तसेच अरुण श्रीपती पाटील यांच्या नावाचा वापर करून दिशाभूल केली जात आहे. प्रत्यक्षात या गावांमध्ये ३०० लिटरही दूध उपलब्ध नसताना तब्बल १९०५ लिटर दूध संकलन होत असल्याचे दाखवले गेले आहे. हे दूध बाहेरच्या गावांतून आणून “गवळी” केल्याप्रमाणे संकलन दाखवण्यात आले असल्याचा गंभीर दावा केला जात आहे.

या प्रकरणात ग्रामपंचायत सरपंच उज्वला सुतार यांनी दिलेला दूध संकलनाचा दाखला संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. “गावात दूध उत्पादनच नगण्य असताना एवढे प्रचंड संकलन कुठून झाले?” असा थेट सवाल उपस्थित होत असून, हा प्रकार म्हणजे सहकार, शासन आणि प्रशासनाची उघड फसवणूक असल्याची टीका जोरात होत आहे.
बोगस दाखल्यांच्या आधारे डेअरी उभारण्याचा प्रयत्न हा केवळ नियमबाह्यच नाही, तर तो सहकारी चळवळीची थट्टा असल्याचा आरोप ग्रामस्थ व विरोधी संस्थांकडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली नाही, तर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात येत आहे.
खोट्या आकड्यांवर उभा राहणारा विकास नको, तर पारदर्शक सहकार हवा, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी या कथित घोटाळ्याचा भंडाफोड करण्याची जोरदार मागणी केली आहे.

