
शाहुवाडी प्रतिनिधी
पांडुरंग फिरींगे
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवा मुख्य परीक्षा सन–२०२४ मध्ये सरूड (ता. शाहूवाडी) येथील गीतांजली गोपाळ साठे–आपटे यांनी उल्लेखनीय यश संपादन करत उद्योग संचालक (तांत्रिकी गट–अ) या राजपत्रित पदावर निवड मिळवली आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालात त्यांनी ५१७.२५ गुण प्राप्त करून आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली.
गीतांजली या सरूड येथील पोलीस उपनिरीक्षक राहुल चंद्रकांत आपटे यांच्या पत्नी असून, सध्या त्या ठाणे येथे विक्रीकर निरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर त्यांनी प्रशासकीय सेवेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
विशेष म्हणजे गीतांजली यांनी यापूर्वीही ए.एम.व्ही.आय., विक्रीकर निरीक्षक, फूड इन्स्पेक्टर, कर निर्धारक (गट–अ) नगरपालिका अशी अनेक मानाची राज्य सेवा पदे मिळवत आपल्या गुणवत्ता व क्षमतेचा ठसा उमटवला आहे. उद्योग संचालकपदी झालेली ही निवड त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील आणखी एक सुवर्णपान ठरली आहे.
या यशामागे त्यांना वडील गोपाळ साठे (निवृत्त मुख्याध्यापक), आई क्रांती साठे, सासू श्रीमती पुजादेवी आपटे (मुख्याध्यापिका) यांचे मोलाचे मार्गदर्शन व पाठबळ लाभले. तसेच पती राहुल आपटे हे सध्या मुंबई पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून, त्यांनीही सदैव प्रेरणादायी साथ दिली.
गीतांजली आपटे–साठे यांच्या या यशामुळे सरूड पंचक्रोशीसह शाहूवाडी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून येऊन राज्यसेवेतील सर्वोच्च पदापर्यंत केलेली ही झेप अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

