
कोतोली प्रतिनिधी पांडुरंग फिरींगे
‘चला भय्यासाहेब समजून घेऊया’ या उपक्रमांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांची ११३ वी तालुकास्तरीय जयंती कोतोली येथे उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.
सन १९६२ मध्ये भय्यासाहेब आंबेडकर यांनी कोतोली (ता. पन्हाळा) येथे ऐतिहासिक बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रमाचे नेतृत्व केले होते. याच पावन स्थळी दिक्षाभूमी फाउंडेशन, कोतोली यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ कोतोली येथे दरवर्षी भय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते.
याच अनुषंगाने रविवार, दि. ११ जानेवारी रोजी दुपारी २.०० वाजता कोतोली येथे ‘चला भय्यासाहेब समजून घेऊया’ या उपक्रमांतर्गत तालुकास्तरीय जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भय्यासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ‘सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाचे संपादक ज. वि. पवार हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तसेच भन्ते सिरीसरो, भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले, निवृत्त कस्टम अधिकारी मदन पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा, पन्हाळा तालुका शाखेचे अध्यक्ष उत्तम जाधव हे असणार आहेत.या कार्यक्रमास २२ प्रतिज्ञा अभियान पन्हाळा व भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा पन्हाळा यांच्या वतीने बौद्ध बांधव, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचे कार्य प्रत्येक गावात पोहोचवण्याचा संकल्प
चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्यांचे जनक, संपादक, उद्योजक व धम्मप्रसारक असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकमेव सुपुत्र यशवंतराव (सूर्यपुत्र भय्यासाहेब) आंबेडकर यांच्या कार्याची माहिती पन्हाळा तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प भारतीय बौद्ध महासभेने केला आहे.याअंतर्गत ज. वि. पवार संपादित ‘सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक व भय्यासाहेब आंबेडकर यांचा फोटो पन्हाळा तालुक्यातील १०९ गावांतील विहारांना भेट देण्यात येणार आहे. हा उपक्रम २२ प्रतिज्ञा अभियान पन्हाळा टीमच्या सहयोगाने राबविण्यात येणार आहे.

