विजय देवणेंना हटवले, सुनील शिंत्रे शिवसेनेचे नवे जिल्हाप्रमुख

0
96

कोल्हापूर प्रतिनिधी: प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : गेली अनेक वर्षे शिवसेना ग्रामीणचे जिल्हाप्रमुख असलेल्या विजय देवणे यांना हटवून त्यांच्या जागी गडहिंग्लजचे प्रा. सुनील शिंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. देवणे आणि हाजी अस्लम सय्यद यांना नवे सहसंपर्कप्रमुख घोषित करण्यात आले आहे.

शिवसेनेच्यावतीने त्यांच्या मुखपत्रातून या नव्या निवडी जाहीर करण्यात आल्या. दरम्यान, देवणे या बदलांवर नाराज असून, ते नॉट रिचेबल आहेत. दोन दिवसांत कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन पुढील भूमिका जाहीर करणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

शिंत्रे यांच्याकडे चंदगड, राधानगरी आणि कागल या तीन विधानसभा मतदारसंघाची जिल्हाप्रमुख म्हणून तर याच तिन्ही मतदारसंघांचे सहसंपर्कप्रमुख म्हणून देवणे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. देवणे यांच्याकडे याच तीन मतदारसंघांची जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी होती.

आता त्यांना सहसंपर्कप्रमुख केले म्हणजे संघटनेतून बाजूला केल्याचाच प्रकार आहे.

संजय मंडलिक मुख्यमंत्री शिंदे गटात गेल्यावर देवणे यांनी कोल्हापूर लोकसभेचे संभाव्य उमेदवार म्हणून तयारी सुरू केली होती. त्यालाही या बदलाने ब्रेक लागला आहे. हाजी अस्लम सय्यद यांना शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ विधानसभा मतदारसंघांचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे.

देवणे यांच्याबद्दल गेल्या वर्षभरापासून अनेक तक्रारी होत्या. आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन देवणे यांच्या कार्यपद्धतीबद्दल या तक्रारी केल्या होत्या. यामध्ये ते पदाधिकाऱ्यांना कसा त्रास देतात याचेही वर्णन करण्यात आले होते.

यावेळी या पदाधिकाऱ्यांनी या तक्रारी माध्यमांपर्यंत कशा गेल्या, अशी विचारणा संबंधितांना केली होती. परंतु, या तक्रारींची दखल घेत देवणे यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटवण्यात आले.

शिंत्रेंनी लढवली होती विधानसभा

आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष असलेले प्रा. सुनील शिंत्रे हे गडहिंग्लज येथे वास्तव्यास आहेत. त्यांनी २०१३ साली बाबासाहेब कुपेकर यांच्या निधनानंतरची विधानसभेची पोटनिवडणूक शिवसेनेतर्फे लढवली. आजरा कारखान्यात ते २०११ पासून संचालक आहेत.

केदारी रेडेकर शिक्षण संस्थेचे ते सचिव असून, सारथी विश्वस्त संस्था, रिंग रोड कृती समिती, युनायटेड फुटबॉल असोसिएशन गडहिंग्लज, गडहिंग्लज तालुका फुटबॉल असोसिएशन, रोटरी क्लब आदी ठिकाणी कार्यरत आहेत.

सय्यद यांनी लढवली होती लोकसभा

हॉटेलचे मालक असलेले हाजी अस्लम सय्यद यांनी याआधीची हातकणंगले लोकसभा निवडणूक वंचितचे उमेदवार म्हणून लढवली होती. त्यांना तब्बल १ लाख २४ हजार मते मिळाली होती.

ते आयसोलेशन हॉस्पिटलच्या मागे कोल्हापूर येथे वास्तव्यास असून, त्यांनी उचगाव येथे नॅशनल एज्युकेशन सोसायटी सुरू केली असून, प्ले ग्रुप ते अकरावीपर्यंत ८५० विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here