सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे शिष्यवृत्ती द्या, कोल्हापुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन

0
81

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

कोल्हापूर : सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी करत संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारी दसरा चौकात आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती देण्याची मागणी १८ एप्रिलच्या मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत मंत्री चंद्रकात पाटील यांनी मान्य केली होती.

मागणी मान्य केल्याबद्दल मंत्री पाटील यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र, ४ मे रोजी हा निर्णय रद्द करून सरकारने मराठा समाजाला फसविल्याचा आरोप संशोधक विद्यार्थ्यांनी केला.

नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती मिळत नसल्याने दीड-दोन वर्षे संशोधन कार्यात अडथळा निर्माण होऊन मराठा समाजातील विद्यार्थी मुख्य प्रवाहातून बाजूला पडत आहेत. बार्टी संस्था संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती देते, मग सारथी का देत नाही ?, मराठा समाजाला वेगळा न्याय कशासाठी ? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला.

याआधी सारथी संस्था ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होती. मात्र, १ जूनला बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या योजनांमध्ये सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती बॅचला केवळ ५० जागाच ठेवल्या आहेत.

यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.

यावेळी संभाजी खोत, क्रांतिसिंह देसाई, संयोगिता पाटील, सौरभ पवार, धनश्री मोरे, निकिता शिंदे, मृणाल उलपे, सुहासिनी यादव, ज्योती थोरात, गौरी खोत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here