कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
मोदी सरकारने महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल टाकत महिला आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. महिला आरक्षण विधेयक आज राज्यसभेत मांडले जात आहे. लोकसभेत ४५४ खासदारांनी विधेयकाला पाठिंबा दिला.
हे विधेयक मंजूर झाल्याने महिलांना लोकसभा आणि विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. खरं तर लोकसभेत ४५४ खासदारांनी महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा दिला, तर AIMIM चे असदुद्दीन ओवेसी आणि महाराष्ट्रातील खासदार इम्तियाज जलील यांनी विरोधात मतदान केले.
दरम्यान, या विधेयकावरून चांगलेच राजकारण तापले आहे. काँग्रेसने या विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या एका मागणीवरून भाजपा आणि काँग्रेसचे दोन्ही राष्ट्रीय अध्यक्ष आमनेसामने आले आहेत.
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी खर्गे यांना प्रत्युत्तर देताना सडकून टीका केली. खर्गेंवर बोलताना नड्डा म्हणाले की, तुम्हाला महिला आरक्षण विधेयक नियमांशिवाय लवकर मंजूर करायचे आहे, त्यामुळेच तुम्हाला सरकार कसे चालवायचे हे कळत नाही आणि म्हणूनच तुम्ही इथे विरोधी पक्षात बसला आहात.
राहुल गांधींना डिवचले
मल्लिकार्जुन खर्गेंशिवाय खासदार राहुल गांधींना देखील नड्डांनी लक्ष्य केले. “काँग्रेसला महिला आरक्षण विधेयकावर घाई करायची आहे, पण वायनाडची जागाच महिलांसाठी राखीव होईल हे त्यांना माहीत नाही”, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधींना त्याच्या मतदारसंघावरून डिवचले.
तसेच देशातील महिला कधीच दुर्बल आणि गरीब राहिल्या नाहीत. आज महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे असून अनेक गोष्टींमध्ये पुरुषांना मागे टाकले आहे, असेही यावेळी नड्डांनी नमूद केले.
दरम्यान, राज्यसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरू आहे. यावर अनेक खासदारांनी पाठिंबा दर्शवला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी चर्चेदरम्यान सांगितले की, महिलांसाठी आरक्षण विधेयक आणणे म्हणजे त्यांच्यावर उपकार करणे नाही.
कारण महिलांचा आदर करणे हिच आपली संस्कृती आहे.