प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह कुणाचं या वादावर शुक्रवारी केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी पार पडली. दरम्यान राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या 41 आमदारांची यादी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मात्र, अजित पवार गटानं 42 आमदार आपल्या बाजून असल्याचा दावा केला असल्याने तो बेचाळीसावा आमदार कोण? अशी चर्चा रंगली होती. आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे . कारण ते बेचाळीसावे आमदार म्हणजे, नवाब मलिक असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे .
याबाबत अधिक माहिती अशी कि ,राष्ट्रवादी कोणाची हा वाद सध्या निवडणूक आयोगासमोर गेला असून यावर सुनावणी सुरू आहे. कालपासून सुरू असलेल्या या सुनावणीत राष्ट्रवादीच्या एकूण 53 आमदारांपैकी 42 आमदार आमच्या पाठीशी असल्याचा दावा अजित पवार गटाच्या वतीनं करण्यात आला होता.
मात्र या सुनावणीआधी अजित पवार गटाच्या 41 आमदारांची यादी जाहीर झाली होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटासोबत असणारा बेचाळीसावा आमदार कोण? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत होता .
आता नवाब मलिकच अजित पवार गटाचे बेचाळिसावे आमदार असल्याची माहिती समोर आली आहे . या निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान अजित पवार गटाकडून असा दावा करण्यात आला आहे. तसेच, नवाब मलिकांना तुरुंगातून बाहेर काढण्या मागे अजित पवार असल्याची चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीत शरद पवार यांच्या गटाची भूमिका वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी मांडली. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून वकील मानिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला.
पक्षाचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची 30 जूनलाच निवड करण्यात आलीय. याची माहिती निवडणूक आयोगाला 30 जूनलाच देण्यात आल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला.
शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, असा दावा अजित पवार गटाने केला आहे. शरद पवार यांच्याकडून पक्षात मनमानी केली जाते. असेही अजित पवार गटानं म्हटलं आहे. दरम्यान, विधीमंडळ बहुमत आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे.
पक्षामध्ये कुठेही फूट नाही. एक गट बाहेर पडला. मूळ पक्ष आमच्याकडे आहे, असा दावा शरद पवार गटाने केलाय. कोणताही निर्णय होत नाही तोपर्यंत चिन्ह गोठवू नका. निर्णय होईपर्यंत चिन्ह आमच्याकडेच ठेवा, अशी विनंती शरद पवार गटानं केली आहे .