
कोतोली (प्रतिनिधी): पांडुरंग फिरींगे
कोतोली आणि कळे जिल्हा परिषद मतदारसंघासह दोन्ही पंचायत समिती गणांमध्ये राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या सर्व मतदारसंघांमध्ये जनसुराज्य पक्षाला जाहीर पाठींबा देत मोठा आणि निर्णायक राजकीय निर्णय घेतला आहे.
या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले, त्यामुळे जनसुराज्य पक्षाच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग अधिकच सुकर झाला आहे. हा निर्णय स्थानिक विकास, एकत्रित ताकद आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेण्यात आल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “व्यक्तीपेक्षा विचार आणि पक्षापेक्षा विकास महत्त्वाचा आहे. जनसुराज्य पक्षाच्या माध्यमातून मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधता येईल, या विश्वासातूनच हा पाठींबा देण्यात आला आहे.”

जनसुराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये या निर्णयामुळे उत्साहाचे वातावरण असून, हा पाठींबा म्हणजे जनतेच्या विश्वासावर उमटलेली शिक्कामोर्तब असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. स्थानिक राजकारणात या घडामोडीला निवडणुकीतील टर्निंग पॉईंट मानले जात आहे.राष्ट्रवादी व जनसुराज्य पक्षाच्या या युतीमुळे आगामी निवडणुकीत विकासाचा अजेंडा केंद्रस्थानी राहणार, असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


