कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्याची जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने सुरु करण्यात आलेली जनसंवाद प्रबोधन यात्रा बुधवारी कोल्हापुरात आली.
गडहिंग्लजसह कोल्हापुर शहरातील अनेक शाळा-कॉलेजमध्ये या कायद्याची जनजागृती करण्यात आली. अनिसच्या अध्यक्ष सरोज पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून या यात्रेचे स्वागत करण्यात आले. या यात्रेसोबत सजवलेली गाडी आहे. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची कलमे चित्रीत केली आहेत.
जादूटोणा प्रतिबंधक व उच्चाटन कायद्याची अंमलबजावणी होऊन दहा वर्षे लोटली. त्यानुसार साडेबाराशे गुन्हे या कायद्याखाली नोंदवले. पण, अजूनही अंधश्रध्देचे प्रस्थ कमी होत नाही.
गुप्तधनासाठी खून किंवा चेटूक भानामतीच्या संशयावरून मारहाण, खून, बहिष्कार हे प्रकार वाढत चालले आहेत. बऱ्याच ठिकाणी तपास अधिकाऱ्यांना या कायद्याची व्यवस्थित माहिती नाही.
या कायद्याला दहा वर्षे झाल्याच्या निमित्ताने कायद्याची जनजागृती करण्यासाठी ही यात्रा काढली आहे. २० ऑगस्टपासून सुरु झालेली ही यात्रा ५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण राज्यात जाणार आहे.
कोल्हापुरात करवीर प्रशाला, शहाजी लॉ कॉलेज, प्रबुद्ध भारत हायस्कूल, गडहिंग्लजचे साधना हायस्कूल, शिवराज महाविद्यालय येथे या कायद्याबाबत प्रबोधन केले. यावेळभ समन्वयक नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, भगवान रणदिवे यांनी व्याख्यान तसेच चमत्काराचे प्रयोग करून कायद्याची माहिती सांगितली. रमेश वडणगेकर, अनिल चव्हाण, प्रा. डॉ विलासराव पोवार, संजय सुळगावे, संजय आरदाळकर, आकाराम कांबळे, गीता हसुरकर, सीमा पाटील, माणिक यादव हे कार्यकर्ते या यात्रेत सहभागी झाले