Kolhapur- बाळूमामांच्या खजिन्यावर डल्ला: देवालयाच्या ३३० कोटींच्या उत्पन्नात घोटाळा

0
78

बाळूमामांची ३० ते ३५ हजारांवर मेंढ्या आहेत. त्यांचे १८ बग्या (कळप) असून, एका बग्यात दीड ते दोन हजार मेंढ्या असतात. सोबत दोन ट्रॅक्टर, पाच ट्रॉली, एक जनरेटर, पाण्याचा टँकर, कारभारी, मेंडके, मदतनीस असतात.

रथात बाळूमामांची मूर्ती असते. हे बग्गे महाराष्ट्रासह कर्नाटकातील गावागावांमध्ये फिरतात. तळाच्या ठिकाणी आरती, महाप्रसाद, कीर्तन होते. पंचक्रोशीतील हजारो माणसं दर्शन घेतात. देणगी, धान्य, बकरी, मेंढी देतात.

बकरी हे उत्पन्नाचे मोठे स्रोत असून, त्यातून कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. पण त्याच्या नोंदी ट्रस्टकडे नाहीत, हाच सर्वांत मोठा गैरव्यवहार आहे. ट्रस्टने २००९ साली २० हजार मेंढ्यांची नोंद केली होती, त्यानंतरच्या पशुधनाची, बदलांची नोंद धर्मादायकडे केली नाही.

बग्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली, जनरेटर, टँकर या जंगम मालमत्तेची नोंद नाही. मेंढ्यांची परस्पर विक्री झाली असून, मोबदल्याची किरकोळ रक्कम ट्रस्टकडे जमा करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. अशा अनेक तक्रारींवर धर्मादाय कार्यालयाच्या अहवालामुळे शिक्कामोर्तब झाले आहे.

पोती भरून पैसे

प्रशासक आल्यानंतर बग्यातील दानपेटी व बकरी विक्रीतून पाच महिन्यांत ९ कोटी ६८ लाखांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. यापूर्वी बगा निवाऱ्यासाठी थांबतात तेथे मुख्य देवालयाचे कर्मचारी जाऊन रक्कम पोत्यात ओतून आदमापुरात घेऊन यायचे.

दानपेटीच्या पंचनाम्यावर दिनांक, दानपेटी व बग्गा नंबर, ठिकाण, तालुका, जिल्हा, वेळेची नोंद नाही. कोणती दानपेटी कोणत्या बग्याची आहे, कोणत्या बग्याची देणगी आली किंवा नाही याची नोंद नाही.

पंचनाम्याच्या नोंदी अपूर्ण व चुकीच्या आहेत. ही बाब गंभीर असून, देवालयाचे नुकसान होत असल्याचा शेरा धर्मादाय उपायुक्त कार्यालयाने दिला आहे. असाच शेरा मंदिरातील दानपेट्यांबाबतही आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here