दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा लाभ घेऊन एसटी महामंडळ प्रवास भाड्यात १० टक्के भाडेवाढ करणार

0
68

प्रचंड भाववाढीमुळे अनेकांचे दिवाळीचे बजेट आधीच कोलमडले असताना आता लालपरीही भाव खाणार आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवाशांच्या गर्दीचा लाभ घेऊन एसटी महामंडळ प्रवास भाड्यात १० टक्के भाडेवाढ करणार आहे.

त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. केवळ तीन आठवडे ही भाववाढ राहणार आहे, ही त्यातील एक दिलासादायक बाब आहे.

दिवाळीत सर्वत्र गर्दी होते. खाद्यपदार्थांपासून तो कपडे आणि घरातील विविध शोभेच्या वस्तू तसेच पादत्राणे आदी सर्व नवीन घेण्यावर भर असतो. त्यासाठी ठिकठिकाणची मंडळी शहरात धाव घेतात.

त्यामुळे एसटीतही प्रवाशांची मोठी गर्दी वाढते. दरवर्षीचा हा अनुभव असल्याने महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून हंगामी भाडेवाढ केली जाते.

सध्या सर्वच प्रकारच्या चिजवस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांचे दिवाळीचे बजेट विस्कटले आहे. अशात पुढच्या काही महिन्यानंतर निवडणूका असल्याने यंदा एसटीकडून भाववाढ केली जाणार नाही, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, तो खोटा ठरवत एसटी महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी सणाची हंगामी तिकिट भाडेवाड करण्याचा निर्णय घेतला आहे.

विविध मार्गावरील सर्वच बसेसच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ होणार आहे. तीन आठवडे ही भाववाढ अंमलात राहणार आहे. अर्थात ऐन दिवाळीच्या सुरुवातीपासून तो संपेपर्यंत ‘लालपरी’ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे.

उद्यापासून वाढणार तिकिट भाडे

एसटीच्या तिकिटांची ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजेच मंगळवारच्या रात्री १२ वाजतापासून लागू होणार आहे. ती २७ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे. २८ नोव्हेंबरपासून मूळ तिकीट दराप्रमाणे तिकीट आकारणी सुरू करण्यात येईल.

‘त्यांना’ही भरावी लागणार रक्कम

ज्या प्रवाशांनी बाहेरगावी जाण्यासाठी एसटी तिकिटाचे आधीच आरक्षण करून ठेवले, अशांनाही भाववाढीचा फटका बसणार असून तिकीटाची उर्वरित १० टक्के रक्कम प्रत्यक्ष प्रवास करताना त्यांना वाहकाकडे द्यावी लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here