कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळ पासून अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत पावसाचा जोर अधिक असून पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकांना जीवदान मिळाले आहे.
ओली अभावी खोळंबलेल्या रब्बी पेरण्यांना वेग येणार आहे.
यंदा अखंड मान्सूनमध्ये जेमतेम एक महिनाच पाऊस झाला. परतीचा पाऊसही न झाल्याने जमिनीत पाणी नाही. त्यामुळे खरीप पिकांचे उत्पादन कमी झाली. जमीनीत ओल नसल्याने रब्बीच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात १५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागल्या होत्या.
गेल्या दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला होता. ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी सकाळ पासूनच पावसाची रिपरिप सुरु झाली. सकाळी आठ वाजल्यापासून पावसाचा जोर वाढत गेला.
सगळीकडे पाणी पाणी झाले असून शिवारात पाणी उभे राहिले आहे. पाण्याअभावी करपणाऱ्या ऊस पिकाला दिलासा मिळाला असून रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. माळरान, डोंगरमाथ्यावरील खोळंबलेल्या रब्बीच्या पेरण्या सुरु होणार आहेत.
पुर्वेकडील तालुक्यात कमी पाऊस
जिल्ह्याच्या पुर्वेकडील काही तालुक्यात तुलनेत पाऊस कमी झाला आहे. आणखी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा तळ असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.