गर्दीचा जनसागर अन् ऊस दरासाठी संघर्षाची खुमखुमी; सीमा भागासह राज्यभरातील शेतकऱ्यांची हजेरी

0
57

कोल्हापूर : सीमा भागासह राज्याच्या कोनाकोपऱ्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या गर्दीचा जनसागर, ऊस दरासाठीच्या संघर्षाची खुमखुमी, एकच गट्टी, राजू शेट्टी अशा घोषणा, बावीस दिवस आक्रोश पदयात्रेने दाखल झालेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांचे दर्शन झाल्यानंतर फुलांची प्रचंड उधळण, फुलांच्या पायघड्या, फटाक्यांची आतषबाजी, दरासाठी शेट्टी यांनी आदेश देताच लढण्याची खुमखुमी दाखविणारे अनेक शेतकरी, असे चित्र मंगळवारी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह मैदानात झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २२ व्या ऊस परिषदेत होते.

गेल्या हंगामातील दुसरा हप्ता ४०० रुपये मिळावा, या मागणीसाठी शेट्टी यांनी २२ दिवस ५२२ किलोमीटरची पदयात्रा करत मंगळवारी ते ऊस परिषदेत सायंकाळी साडेचार वाजता दाखल झाले. लेझीम, टाळ-मृदंगाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी यासह शेतकऱ्यांनी परिषदस्थळी केलेल्या स्वागताने शेट्टी भारावून गेले होते.

शेट्टी व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतरही एकसारखी घोषणाबाजी सुरू होती. शेवटी चालून, चालून आणि बोलून, बोलून माझा आवाज बसला आहे. तुम्ही आता शांता व्हा, अशी विनंती करताच सर्वत्र शांतता पसरली. काही वक्त्यांची भाषणे झाल्यानंतर तेच माईक घेऊन बोलू लागले.

तीन स्क्रीनसमोरही मोठी गर्दी

व्यासपीठावर शेट्टी येण्यापूर्वीच मैदान फुल्ल झाले होते. त्यामुळे मैदानाच्या आजूबाजूच्या रस्त्यावरच शेतकऱ्यांनी ठिय्या मांडला. वक्त्यांची भाषणे पाहता आणि ऐकण्यासाठी लावण्यात आलेल्या विविध ठिकाणच्या तीन स्क्रीनसमोरही मोठी गर्दी होती. शेवटच्या वक्त्याचे भाषण संपेपर्यंत शेतकरी बसून राहिले.

युवकांचा सहभाग लक्षणीय..

परिषदेत यंदा पहिल्यांदा युवकांचा सहभाग लक्षणीय होता. छातीवर बिल्ला आणि दरासाठी लढण्याचा आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

दोन लाख भाकऱ्या

पदयात्रा, ऊस परिषदेसाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या जेवणासाठी जिल्ह्यातून दोन लाख भाकऱ्या संकलित नांदणीत आणले होते. शेतकऱ्यांनी आणि गावांनी लोक वर्गणीतून २५ हजारांवर शेतकऱ्यांना भोजन दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here