दसऱ्याच्या मुहूर्तावर वाहन विक्रीतून मोठी उलाढाल झाली असली तरी, दिवाळीच्या शुभमुहूर्तावर त्यापेक्षा अधिक वाहनांची विक्री झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाने दिलेल्या माहितीवरून दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंगचा धडाका लावला असून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत १ हजार २५९ वाहनांने अधिक विकली गेली आहेत. धनत्रयोदशी आणि लक्ष्मी पूजनाच्या मुहूर्तावर वाहनांची डिलिव्हरी घेण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो.
यंदा पुणे प्रादेशिक परिवहन विभागाच्या हद्दीतून एकूण २० हजार ८३ वाहनांची विक्री झाल्याची नोंद आहे. पाऊसपाणी समाधानकारक झाला तर त्याचा फायदा ऑटोमोबाइल क्षेत्राला होत असतो, यंत्रा मात्र तुलनेत पाऊस कमी असला तरी ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती वाहन विक्रेत्यांनी दिली.
दुचाकी वाहन बाजारात १०० आणि ११० सीसीच्या वाहन खरेदीला प्राधान्य दिले जात आहे, तर दुसरीकडे एसयूव्ही कारला अधिक प्राधान्य दिले जात आहे. मात्र किमान दीड ते दोन महिने कारसाठी वेटिंग असल्याने, मुहूर्तावर वाहन उपलब्ध करून देण्याचे आव्हान वाहन विक्रेत्यांसमोर आहे.
इलेक्ट्रिक वाहनांची विक्री घटली..
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा इलेक्ट्रीक वाहनांची विक्री घटल्याची नोंद आरटीओ कार्यालयाकडून मिळालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. गेल्या वर्षी ५ ऑक्टोबर २०२२ ते २२ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत १ हजार ९२९ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली होती.
यंदा २४ ऑक्टोबर २०२३ ते १० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १ हजार ७०२ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री झाली असल्याने, यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत २२७ इलेक्ट्रिक वाहने कमी विकली गेली आहेत.
रिक्षा, टॅक्सी आणि बसची सर्वाधिक विक्री..
यंदाच्या दिवाळीत एकूण २० हजार ८३ वाहनांची विक्री झाली असून, यामध्ये रिक्षा, टॅक्सी आणि बसची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक झाली आहे. दुचाकी, कार व अन्य गुड्स प्रकारातील वाहनांच्या विक्रीत मात्र मोठी तफावत नसल्याचे दिसून येते.
२०२२ मध्ये दिवाळीत विकलेली वाहने…
१) मोटरसायकल – १२ हजार ४१३
२) कार – ४ हजार ५६४
३) गुड्स – ८४४
४) रिक्षा – ७४५
५) बस – ४८
६) टॅक्सी – २१०
एकूण – १८ हजार ८२४
यंदा दिवाळीत झालेल्या वाहनांची विक्री..
१) मोटरसायकल – १२ हजार ९७१
२) कार – ४ हजार ५५७
३) गुड्स – ८६७
४) रिक्षा – १ हजार ४५
५) बस – ८२
६) टॅक्सी – ५६१
एकूण – २ हजार ८३