मराठी कलाविश्वातील कसलेला अभिनेता म्हणजे डॉ. श्रीराम लागू. केवळ मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी अनेक भूमिका गाजवल्या. सिंहासन, पिंजरा या सिनेमातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.
केवळ गाजल्या नाहीत तर लोकांनी त्यांनी डोक्यावर उचलून घेतलं होतं इतक्या त्या लोकप्रिय झाल्या. आपल्या अभिनयाच्या विविध छटा दाखवत लागू यांनी प्रेक्षकांचं प्रचंड मनोरंजन केलं.
परंतु, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर कायम हसू उमटवणाऱ्या या अभिनेत्याने खऱ्या आयुष्यात बरंच मोठं दु:ख सहन केलं आहे. ऐन तरुण वयात त्यांनी त्यांचा मुलगा गमावला. हे दु:ख आयुष्यभर त्यांना सहन करावं लागलं.
डॉ. श्रीराम लागू यांनी हिंदी-मराठी मिळून असे जवळपास १२५ पेक्षा जास्त सिनेमा केले होते. लागू यांनी प्रत्येक भूमिका जिवंत केली. पुण्यात लहानाचे मोठे झालेल्या लागूंनी वैद्यकीय महाविद्यालयात असताना नाटकात काम करायला सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी नाट्य संस्था सुरू केली. कॅनडा, इंग्लंड येथे ते पुढील शिक्षण घेण्यासाठी गेले. परंतु, त्यांचं मन अभिनयात जास्त रमत होतं. त्यामुळे त्यांनी १९६९ मध्ये डॉक्टरी पेशाला अलविदा करत वसंत कानेटकरांच्या ‘ओशाळला मृत्यू’ या नाटकापासून त्यांच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. यशाची एक एक पायरी चढत असताना त्यांच्या आयुष्यात असा एक काळ आला जिथे ते जागच्या जागीच थिजून गेले. त्याच्या मुलाचं ऐन तारुण्यात वयाच्या २४ व्या वर्षी निधन झालं. या घटनेमुळे त्यांच्या मनावर मोठा आघात झाला.
श्रीराम लागू आणि नाट्यअभिनेत्री दीपा लागू यांना एक मुलगा होता तन्वीर असं त्याचं नाव. एका रेल्वे अपघातात तन्वीरचं निधन झालं. तन्वीर पुणे-मुंबई ट्रेनने प्रवास करत होता.
त्यावेळी झोपडपट्टीतील एका मुलाने ट्रेनवर दगड मारला आणि तोच दगड तन्वीरच्या डोळ्याला लागला. याच दुखापतीमध्ये त्याचं निधन झालं. १९९४ मध्ये तन्वीरचं निधन झालं. त्याच्या निधनानंतर श्रीराम लागू यांनी २००४ पासून तन्वीर सन्मान हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली.