कोल्हापूरात रविवारी, राज्य वकील परिषद; देशभरातील दीड हजार वकिलांची उपस्थिती

0
59

कोल्हापूर : कसबा बावडा येथील न्याय संकुलात उद्या, रविवारी ( दि.३) एकदिवसीय राज्य वकील परिषद कोल्हापूर २०२३ आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला देशभरातून सुमारे दीड हजारांहून अधिक वकील उपस्थित राहणार आहेत.

मंडप उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या परिषदेचे उद्घाटन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना व्हराळे यांच्यासह महाराष्ट्र, गोवा येथील प्रमुख उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रशांत देसाई यांनी शुक्रवारी दिली.

परिषदेस मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित बोरकर, संजय देशमुख, राज्याचे ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ, गोव्याचे ॲडव्होकेट जनरल देवीदास पनगम, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, महाराष्ट्र राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष सुरेंद्र तावडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

न्याय सर्वांसाठी या संकल्पनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी ही परिषदेची संकल्पना आहे. उद्या, रविवारी सकाळी १० वाजता कसबा बावडा न्याय संकुलात परिषदेला सुरुवात होणार आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर जिल्ह्याकरिता मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच कोल्हापुरात व्हावे.

ही प्रमुख मागणी असणार आहे. यासह वकिलांचे प्रलंबित प्रश्न, नवोदित वकीलांसमोरील आव्हाने, न्यायालयीन कामकाजातील दिरंगाई कमी करण्यावर उपायावर चर्चा होणार आहे. याबाबतचे ठरावही या परिषदेत मंजूर केले जाणार आहेत.

या परिषदेचे नियोजन महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲ़ड. पारिजात पांडे, उपाध्यक्ष ॲड. राजेंद्र उमप, सदस्य ॲड. जयंत जायभावे, परिषदेचे मुख्य संयोजक ॲड. विवेक घाटगे, समन्वयक व जिल्हा बार असोसिएशनचे ॲड. प्रशांत देसाई यांच्यासह बार असोसिएशन व तालुका बार असोसिएशन नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here