CID या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेता दिनेश फडणीस यांचं निधन झालं आहे. ते ५७ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
अखेर त्यांची मृत्यूशी झुंज संपली. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. दिनेश फडणीस यांच्या निधनाने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक सेलिब्रिटी आणि चाहते त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
लोकप्रिय अभिनेते शिवाजी साटम यांनीदेखील लाडक्या फ्रेडिरिक्सच्या आठवणीत पोस्ट शेअर केली आहे. दिनेश यांच्या निधनाने शिवाजी साटम भावुक झाले आहेत. इन्स्टाग्रामवर त्यांनी दिनेश फडणीस यांचा फोटो शेअर केला आहे. “साधा, प्रेमळ आणि नम्र”, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत शोक व्यक्त केला आहे.
दिनेश फडणीस यकृताच्या आजाराशी झुंज देत होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना मुंबईतील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका नाही तर अन्य आजारामुळे त्यांच्या लिव्हरवर परिणाम झाला होता. दोन दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. काल रात्री १२ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
दिनेश फडणीस यांना CID मालिकेतून कमालीची लोकप्रियता मिळाली होती. फ्रेडिरिक्स हे विनोदी पात्र त्यांनी साकारलं. याशिवाय दिनेश यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मध्येही कॅमिओ केला होता. अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी छोट्या भूमिका साकारल्या आहेत.