मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी; क्युरेटिव्ह पिटीशनवर निर्णायक लढाई

0
81

नवी दिल्ली – राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असताना आज सुप्रीम कोर्टात आरक्षणावर महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. मराठा आरक्षणाबाबतीत राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केले होते.

आज या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं टिकवलेल्या मराठा आरक्षणास सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिली होती.

या सुनावणीबाबत मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळेल हा १०० टक्के विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयात जे आरक्षण टिकले त्या आरक्षणाला कुणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारं आरक्षण मिळेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणाची मागणी आग्रहीपणे समाज रस्त्यावर उतरून मांडत आहे. त्यामुळे राज्य सरकारही या प्रकरणात कार्यवाही करत आहे. देवेंद्र फडणवीस मु्ख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे हायकोर्टात टिकले होते.

परंतु सुप्रीम कोर्टात या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली. त्यानंतर हा मुद्दा आणखी पेटला. त्यात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला.

त्यानंतर शिंदे सरकारने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली. १३ ऑक्टोबरला सरकारने दाखल केलेल्या पिटीशनवर आज पहिल्यांदा सुनावणी होतेय. त्यामुळे केवळ मराठा समाजच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या सुनावणीकडे आहे.

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात आजची सुनावणी पार पडेल. त्यात युक्तिवाद होणार नसला तरी ही याचिका पुढे न्यायची की नाही यावर निर्णय होईल. या सुनावणीसाठी ५ न्यायाधीशांचे खंडपीठ असेल.

मराठा आरक्षणाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने याचिका केली होती. त्यावर निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली होती.

आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरुद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील अशी लढाई आहे. तर मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आणि जयश्री पाटील अशी दुसरी क्युरेटिव्ह पिटीशन आहे.

२०२१ मध्ये मराठा आरक्षणाबाबत निर्णय देताना न्यायालयाने निकाल देत मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर तत्कालीन सरकारने रिव्हिव्यू पिटीशन दाखल केली. परंतु तीदेखील न्यायालयाने फेटाळली होती.

आता क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली असून त्यावर आज सुनावणी होईल. उद्यापासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होतंय त्या पार्श्वभूमीवर आजच्या सुनावणीत काय निकाल लागतो हे पाहणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here