प्रतिनिधी : प्रियंका शिर्के पाटील
कोल्हापूर : मराठा समाजाविषयी द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या प्रकाश शेंडगे यांचा सकल मराठा समाजाने निषेध केला असून उद्या, शनिवारी तीव्र निदर्शने करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाने शुक्रवारी घेतला.
दरम्यान, सकल मराठा समाजाने दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी दीड तास साखळी धरणे आंदोलन केले.
माजी मंत्री प्रकाश शेंडगे यांनी “मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले पाहिजे असतील तर त्यांनी १० वर्षे लंगोट लावून राहिले पाहिजे. मराठा हातात वस्तरा घेऊन काम करायला तयार आहेत का?” अशी बेताल वक्तव्ये केली आहेत. याचा सकल मराठा समाजाने दसरा चौकात निषेध व्यक्त केला.
शेंडगे हे राजकीयदृष्ट्या विस्थापित आहेत. पुन्हा राजकारणात प्रस्थापित होण्यासाठी महायुतीतल्या एखाद्या घटकांची मदत घेण्यासाठी त्यांच्या सांगण्यावरून ते अशी बेजबाबदार वक्तव्ये करत आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून छत्रपती शाहू महाराजांपर्यंत तसेच आजपर्यंत मराठा आणि धनगर समाजामध्ये असलेला एकोपा, बंधूभाव याला छेद देण्याचा आणि समाजामधील शांततेचा भंग करण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न शेंडगे करीत आहेत.
त्यांचा निषेध करण्यासाठी मराठा समाज उद्या, शनिवारी दुपारी १२ वाजता दसरा चौकात एकत्र येणार आहेत. या प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी मराठ्यांसह इतर समाजानेही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे.
या बैठकीस वसंतराव मुळीक, ॲड. बाबा इंबूलकर, बाबा पार्टे, विजय देवणे, दिलीप देसाई, राजू तोरस्कर, उदय लाड, ॲड. सतिश नलवडे, ॲड. सुरेश कुऱ्हाडे, चंद्रकांत पाटील, अवधूत पाटील, उत्तम वरूटे, महादेव जाधव, महादेव पाटील, अमर निंबाळकर, प्रकाश पाटील, गोपाळ पाटील, संपत्ती पाटील, संयोगिता देसाई, शैलजा बेसाई, सुनिता पाटील उपस्थित होते.