कोल्हापूर : जंगलात, रानावनात दिसणारे निवडूंग ही सर्वांच्याच ओळखीची वनस्पती. त्यामुळे तसे तिचे अप्रूप अनेकांना नाही. मात्र, याच निवडूंगापासून पर्यावरणाचे रक्षण करत सांगलीच्या वेलिंग्टन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी घड्याळाचा बेल्ट, औषधी गोळ्यांवरील आवरण, बटवा बनवून केमिकल वापरला कायमचा फाटा दिला आहे.
निवडुंगापासून बायोप्लास्टिक ही संकल्पना त्यांनी विकसित केली आहे. शिवाजी विद्यापीठात बुधवारी आयोजित अविष्कार संशोधन महोत्सवात सादर केलेल्या अनोख्या संशोधनाने निवडूंगाचे महत्व अधोरेखित केले.
कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन झाले. यावेळी ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी कृषीतंत्रज्ञान, इलेक्ट्रिक, पर्यावरणसह विविध विषयांवर प्रकल्प सादर केले.
वेलिंग्टन महाविद्यालयातील बी.एस्सी. बायोटेक्नॉलॉजीच्या तिसऱ्या वर्षात शिकणारे सुरजित आडगले व आस्था कुंदले या विद्यार्थ्यांनी निवडुंगावरचे हे संशोधन केले.
गेल्या अडीच वर्षांपासून या विद्यार्थ्यांनी या संशोधनासाठी प्रयत्न चालविले होते. त्यासाठी त्यांनी निवडुंगाचे विविध गुणधर्म, त्याचे परिणाम याचा अभ्यास करून त्यापासून विविध प्रोडक्ट बनविले आहेत.
चौकट : जळाले तर होणार लिक्विड :
घड्याचा बेल्ट हा चामड्यापासून तयार केलेला असतो. तो मजबूत बनवण्यासाठी त्यात केमिकलचा वापर होतो. याला आळा घालण्यासाठी या विद्यार्थ्यांनी निवडूंगापासून बेल्ट तयार केला आहे.
यामुळे हातालाही उबदारपणा जाणवतो. फुड पॅकेजिंग बॉक्सही निवडुंगापासून तयार केले आहेत. विशेष म्हणजे या वस्तु जळाल्या तर त्याचे अपोआप लिक्विडमध्ये रुपांतर होते. हेच लिक्विड इतर घटकांसाठीही वापरता येते. भविष्यात निवडुंगापासून कोट बनिवण्याचा मानस असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.