कोल्हापूर : शस्त्रक्रिया ठरल्याने रूग्ण उपाशी राहतो. परंतू भूल देेणारे डॉक्टर गेलेत म्हणून दोन, तीन शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरही निघून जातात. ठरलेल्या शस्त्रक्रिया रद्द करून डॉक्टर जातातच कसे असा सवाल भाजपच्या शिष्टमंडळाने वैदयकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना शुक्रवारी विचारला.
येथील शासकीय विश्रामगृहावर शिष्टमंडळाने येथील छत्रपती प्रमिलाराजे रूग्णालयातील प्रश्नांबाबत मुश्रीफ यांच्याशी यावेळी सविस्तर चर्चा केली. न्यूरोसर्जरीचे काम ठप्प असणे, न्यूरामायक्रोस्कोपची गरज, एमआरआयसाठीची यंत्रणा, नवजात बाळांसाठी आवश्यक असणाऱ्या इन्क्युबेटरची संख्या कमी, दिव्यांगांची तपासणी पहिल्या मजल्यावर असणे अशा अनेक अडचणी मांडल्या.
भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, उद्या तुमच्यावर शस्त्रक्रिया होणार म्हणून रूग्णांना उपाशी रहायला सांगितले जाते आणि दुसऱ्या दिवशी दोन, तीन शस्त्रक्रिया झाल्यानंतर डॉक्टर भूलतज्ज्ञ नाही म्हणून निघून जातात हे चित्र बरोबर नाही. यावेळी महेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनीही तक्रारी मांडल्या. यावेळी राहूल चिकोडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, एमआरआयची यंत्रणा पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार आहे. अन्य आवश्यक यंत्रणा आणि सोयी, सुविधांसाठी अधीष्ठाता यांच्याशी चर्चा करून येत्या आठ दिवसात हे प्रश्न सोडविले जातील.