स्वयंसिध्दा उपक्रमासाठी महिलांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवर जास्तीत जास्त नोंदणी करावी : राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे

0
48

प्रतिनिधी :जानवी घोगळे

मुंबई, दि. १५ :
महिला सशक्तिकरणाच्या उद्देशाने राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या ‘स्वयंसिध्दा’ उपक्रमात अधिकाधिक महिला विद्यार्थीनींचा सहभाग वाढवण्यासाठी व्यापक जनजागृती उपक्रम राबवावेत. तसेच स्वयंसिध्दा उपक्रमाशी संबंधित महिलांनी *‘स्त्रीशक्ती’ ॲपवर जास्तीत जास्त नोंदणी करावी, असे निर्देश माननीय राज्यपालांचे सचिव *डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.

राज्यपालांच्या सचिवालयातील ‘लोकभवन’ येथे डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे स्वयंसिध्दा उपक्रमाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस राज्यपालांचे उपसचिव *राम मूर्ती, लोकभवनमधील सहसंचालक (वै. वि. मं.) *विकास कुलकर्णी, तसेच राज्यातील विविध सार्वजनिक विद्यापीठांचे स्वयंसिध्दा उपक्रम अंमलबजावणीतील प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले की, माननीय राज्यपाल महोदयांच्या मार्गदर्शनानुसार महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी ‘स्वयंसिध्दा’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक महिला सदस्यांनी स्वयंसिध्दा वेब पोर्टलवर नोंदणी केली असून, त्या सर्वांनी ‘स्त्रीशक्ती’ ॲपवरही अनिवार्यपणे नोंदणी करावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, प्रत्येक राज्य सार्वजनिक विद्यापीठातील स्वयंसिध्दा महिला अधिकाऱ्यांनी नियमित बैठका घेऊन राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती स्वयंसिध्दा पोर्टलवर तसेच प्रत्येक विद्यार्थीनीच्या वैयक्तिक स्वयंसिध्दा मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करावी. यामुळे उपक्रमांची दृश्यमानता वाढेल आणि अधिकाधिक महिलांना सहभागासाठी प्रेरणा मिळेल. स्वयंसिध्दामधील उपक्रमांमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी नाविन्यपूर्ण व विविध उपक्रम राबविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सुचवले.

डॉ. नारनवरे यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार, स्वयंसिध्दा विद्यार्थीनींनी निवडणूक आयोगाच्या ‘स्वीप (SVEEP)’ उपक्रमाअंतर्गत महिलांमध्ये मतदानाच्या हक्काबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करावी. शहरी तसेच ग्रामीण भागात विविध जनजागृती कार्यक्रम राबवून महिलांना मतदानाचे महत्त्व, प्रक्रिया आणि त्यांचे हक्क याबाबत सविस्तर माहिती द्यावी. या प्रचारासाठी ‘Women Empowerment’ हा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर व्यापक प्रसिद्धी करावी, असेही त्यांनी निर्देश दिले.

महिला व बालविकास विभागाच्या ‘आदिशक्ती’ उपक्रमामध्ये स्वयंसिध्दाचा सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले असल्याचे नमूद करून, महादेव प्रोजेक्टसाठी महिला फुटबॉल टीम तयार करण्यासाठी स्वयंसिध्दामार्फत विशेष प्रयत्न करावेत, असेही डॉ. नारनवरे यांनी सांगितले. स्वयंसिध्दा उपक्रमांची माहिती प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचावी यासाठी सातत्याने प्रयत्न करणे गरजेचे असून, स्वयंसिध्दा अंतर्गत यशस्वी ठरलेल्या महिलांच्या यशोगाथा पोर्टलवर प्रसिद्ध कराव्यात, असेही त्यांनी सुचवले.

याशिवाय, ज्या विद्यापीठांमध्ये स्वयंसिध्दा अंतर्गत अधिकाधिक प्रभावी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत, त्या विद्यापीठांतील विद्यार्थीनींचे रँकिंग काढण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बैठकीच्या शेवटी, स्वयंसिध्दा उपक्रम हा केवळ एक योजना न राहता महिलांच्या आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक सहभाग वाढवणारे एक प्रभावी व्यासपीठ ठरावे, यासाठी सर्व संबंधितांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here